PM Modi Rally : विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात 8 रॅली
•विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची तयारी केली आहे. भाजपने निवडणूक प्रचारसभेसाठी पंतप्रधान मोदींसह बड्या नेत्यांची यादीही तयार केली आहे.
मुंबई :- विधानसभा निवडणुकीबाबत भाजपने मोठ्या प्रमाणात मैदानात उतरली असून केंद्रातील सर्वच नेते महाराष्ट्रात येणार असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र जिंकणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपने मजबूत किल्ले बांधले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने अत्यंत विचारपूर्वक रणनीती आखली आहे. विरोधकांचे मनोधैर्य खचवण्यासाठी भाजपने यावेळी पक्षातील दिग्गजांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीवरून असे दिसते आहे की, पक्ष महाराष्ट्रात या नेत्यांच्या मोठ्या जाहीर सभा आयोजित करणार आहे.
स्टार प्रचारक आणि पक्षाच्या प्रभावशाली नेत्यांना निवडणूक रॅलींमध्ये उतरवून मतदारांना आकर्षित करण्यात भाजप कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 6 मोठ्या चेहऱ्यांच्या 170 हून अधिक जाहीर सभा आयोजित करण्याची योजना तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पंतप्रधान मोदींच्या एकूण 8 जाहीर सभा घेण्याची योजना तयार करण्यात आली आहे.