Pune Bribe News : गुन्ह्यात अटक न करण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकसह एकाला पकडले,‘एसीबी’ची टाकळी हाजी पोलीस चौकीत कारवाई
•लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी कारवाई करत पोलीस उपनिरीक्षक आणि एक खाजगी व्यक्तीला लाच प्रकरणी ताब्यात घेतले आहे, अटक करू नये याकरिता मागितली होती 25 हजार रुपयांची लाच
पुणे :- शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये मुलाला अटक होऊ नये याकरिता पोलीस उपनिरीक्षक आणि एका खाजगी व्यक्तीने तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी एसीबीने कारवाई करत खाजगी व्यक्ती आणि पोलीस उपनिरीक्षक यांना ताब्यात घेतले आहे. लाच स्वीकारताना एसीबीने ने टाकळी हाजी पोलीस चौकीत धाड टाकत ताब्यात घेतले आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, माणिक बाळासाहेब मांडगे पोलीस उपनिरीक्षक शिरूर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण आणि खाजगी व्यक्ती सुभाष मुंजाळ (रा. कवठे यमाई, शिरूर पुणे) यांना दहा हजाराची लाच स्वीकारताना अटक केली आहे.यातील तक्रारदार यांच्या मुलाच्या विरुद्ध शिरुर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी तसेच त्याला गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे यांनी तक्रारदार यांचेकडे 25 हजारांची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे यांनी तक्रारदार यांचे मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांना सुभाष मुंजाळ (खाजगी व्यक्ती) याचेशी बोलण्यास सांगितले. खाजगी व्यक्ती सुभाष मुंजाळ यांने तक्रारदाराकडे साहेबांना देण्यासाठी म्हणून दहा हजार रुपये लाच मागणी केली आहे पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे यांनी दुजोरा देवून त्यांनी सुद्धा दहा हजार रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले आहे. आज 24 ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे व खाजगी इसम सुभाष मुंजाळ यांचेवर शिरुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार अधिनियमन 7,7(अ),12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर तपास करत आहेत.