उपमुख्यमंत्री Ajit Pawar शेतकऱ्यांच्या बांधावर
•जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महिला भगिनींशी संवाद
धुळे :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यातील जनतेशी थेट संवाद साधण्याकरिता या यात्रेच्या माध्यमातून ते राज्यातील महिला भगिनींशी संवाद साधत आहेत. लाडकी बहिणी योजनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार महिलांना पक्ष तसेच महायुतीला साथ देण्याचे साद घालत आहेत. यातच अजित पवार दौरा करत असताना धुळ्यामध्ये आज त्यांची सभा झाली. ही सभा संपवून ते जात असताना त्यांचा ताफा अचानक एका शेताजवळ थांबला. आणि दादा थेट शेतात गेले. यावेळी शेतात काम करत असणाऱ्या महिलांशी देखील त्यांनी संवाद साधला.
अजित पवार यांनी शेतात काम करणाऱ्या महिलांची विचारपूस केली. मला ओळखलेत का? तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय का? त्यात बँकेचा खात्याचा क्रमांक दिलाय का? 17 तारखेला तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. त्याचा चांगला फायदा घ्या, तसेच आमच्या पाठीशी आशीर्वाद राहू द्या, अशा प्रकारचा संवाद अजित पवार यांनी महिलांशी साधला. अजित पवार यांनी विचारलेल्या मला ओळखले का? या प्रश्नाला देखील महिलांनी प्रत्युत्तर देत त्यांची ओळख सांगितली. या वर अजित पवार यांना देखील समाधान वाटले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ
राज्याच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार,अजित पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार अजित पवार यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. मात्र, असे असताना देखील अजित पवार यांनी थेट शेतात महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला. मी उपमुख्यमंत्री आहे. काम करत असताना मला विविध विभागाचे अधिकारी भेटत असतात. त्यानुसार माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात आले. मात्र जोपर्यंत माझ्या माय माऊलींची राखी माझ्या हाताला आहे, तोपर्यंत माझ्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही, अशी मला खात्री आहे. राज्यातील माय माऊलींसाठी काम करत असताना माझा जीव गेला तरी ते माझे भाग्य समजेल, असे म्हणत अजित पवार यांनी महिलांना देखील भावनिक साद घातली.