Champa Shashthi 2024 : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या तीर्थक्षेत्र जेजूरी नगरीत आजपासून चंपाषष्टी षडरात्रोत्सव प्रारंभ झाला.जेजूरी गडकोटात उत्सवमूर्तींना करविर पीठाचे शंकराचार्यांच्या हस्ते विधिवत पूजा अभिषेक करून उत्साहात व धार्मिक वातावरणात बालदारीत घट स्थापना करण्यात येते. सहा दिवस जेजुरीत षडरात्रोत्सव साजरा होत असतो.
पौराणिक काळात ऋषी मुनींना त्रास देणार्या मणी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने मल्हारी मार्तंडाचा अवतार धरण करून चंपाषष्ठीच्या दिवशी दैत्यांचा वध करून विजय मिळवला.हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठीपर्यंत ६ दिवस चालले होते. तेव्हापासून या सहा दिवसात खंडोबा गडावर विजयोत्सव साजरा केला जातो. चंपाषष्ठी हा दिवस विजय दिन म्हणून ही साजरा केला जातो.
उत्सवाचा प्रारंभ करताना आज पहाटेच मुख्य मंदीरात पाकाळणी करण्यात येते. मार्तंड भैरव मूर्तीला दही दूध व तेलाने स्नान घालण्यात आले.सभोवताली गाभार्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात येत असते.महापूजा उरकल्यानंतर श्री खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना मिरवणुकीने मंदीर प्रदक्षिणा घातली जाते. मंगलमय वातावरणात तेथे उत्सवमूर्तीची स्थापना करून समोर घट बसवण्यात येतात.प्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण गडकोटाला रोषणाई करण्यात आली आहे, गाभार्यात व मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आहे.