Worli Accident News : वरळीत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना कारची धडक; हवालदार दत्तात्रेय कुंभार यांचा दुर्दैवी मृत्यू

Worli Latest Accident News : मंगळवारी सकाळी 7.45 च्या सुमारास भीषण अपघात, महिला पोलीस शिपाई रिद्धी पाटील जखमी
मुंबई :- मुंबईतील वरळी परिसरात बंदोबस्तावर असलेले पोलीस हवालदार दत्तात्रेय कुंभार (52 वय) आणि महिला पोलीस शिपाई रिद्धी पाटील यांना मंगळवारी सकाळी एका भरधाव मोटारगाडीने धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले हवालदार कुंभार यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या सहकारी रिद्धी पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही घटना मंगळवारी सकाळी 7.45 च्या सुमारास वरळी-वांद्रे सागरी सेतू आणि सागरी किनारा मार्गाजवळ घडली. अपघातानंतर लगेचच दोन्ही पोलिसांना तातडीने वॉकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, हवालदार दत्तात्रेय कुंभार यांच्या जखमा गंभीर असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुंभार आणि पाटील दोघेही वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चालक रामचंद्र राणे (46 वय) याला त्याच्या ‘ग्रँड आय 19’ मोटारगाडीसह ताब्यात घेतले आहे. राणेची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका कर्तव्यनिष्ठ पोलिसाचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.


