मुंबई

Weather Update : विक्रमी थंडीची लाट! – नगरमध्ये 6.6 अंश, पुणे-नाशिकमध्ये पारा 7 अंशांखाली; महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

•उत्तर भारतातून आलेल्या गार वाऱ्यांमुळे शीतलहरींचा प्रभाव; पुढील दोन दिवस पारा आणखी घसरणार, अनेक शहरांचे तापमान 10 अंशांखाली

मुंबई :- उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वेगाने वाहत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हुडहुडी वाढली आहे. अनेक शहरांचे किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा त्याहून खाली नोंदविण्यात येत आहे. या थंडीचा परिणाम म्हणून काल गुरुवारी, सलग तिसऱ्या दिवशी अहिल्यानगर (अहमदनगर) येथे राज्यातील सर्वाधिक कमी किमान तापमान 6.6 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.

पुण्यासह नाशिकचे किमान तापमानही 7 ते 8 अंशांवर पोहोचले आहे. नाशिकजवळील निफाडमध्ये तर पारा 6.1 अंशावर गेला आहे, ज्यामुळे नाशिकमध्ये थंडीत मोठी वाढ झाली आहे. मुंबईचे किमान तापमान 15 अंश, तर माथेरानचे तापमान 17 अंश नोंदविण्यात आले, ज्यामुळे मुंबईकरांना माथेरानमधील थंडीचा अनुभव येत आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही पारा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. जळगावमध्ये 7.0, गोंदियामध्ये 8.0 आणि नागपूरमध्ये 8.1 अंशांची नोंद झाली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तरेकडून वेगाने महाराष्ट्राकडे सरकत असलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवसांत राज्यात थंडीची लाट पसरणार आहे. राज्यातील अनेक भागांत किमान तापमानाचा पारा 7 ते 10 अंशांपर्यंत पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच शेजारील प्रदेशांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

याशिवाय, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर आणि गोंदिया या 14 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांनुसार, ला निनोच्या प्रभावामुळे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही महिने राज्यासाठी सर्वाधिक थंड ठरण्याची शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवस थंडी कायम राहणार असून, सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0