मुंबईतच हक्काची घरे हवीत! 9 जुलै रोजी गिरणी कामगारांचा आझाद मैदानावर मोर्चा

•मिठागर, धारावीसाठी जागा आहे… मग गिरणी कामगारांसाठी का नाही?
मुंबई | “मुंबईच्या जडणघडणीत घाम गाळणाऱ्या गिरणी कामगारांना घरे मुंबईतच हवीत!” या मागणीसाठी बुधवार, 9 जुलै रोजी हजारो गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांचा मोर्चा थेट आझाद मैदानावर धडकणार आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघासह 14 कामगार संघटनांनी या संघर्षमय मोर्चाचे आयोजन केले असून, शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यास ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे स्वतः या मोर्चात सहभागी होणार आहेत.
मुंबईतल्या गिरण्यांच्या जमिनीवर घरे देण्याच्या योजनेअंतर्गत पावणे दोन लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांचे अर्ज म्हाडाकडे जमा झाले आहेत. मात्र आजवर फक्त 25 हजार अर्जदारांनाच घरे मिळू शकली आहेत. उर्वरित दीड लाख अर्जदारांसाठी सरकारने मुंबई महानगर प्रदेशातील शेलू आणि वांगणी येथे खासगी बिल्डरमार्फत 81 हजार घरांचा प्रस्ताव सादर केला आहे.
हा प्रस्ताव कामगार संघटना आणि अर्जदारांनी पूर्णपणे फेटाळला असून, मुंबईबाहेर घरं नको, मुंबईतच हवीत अशी ठाम मागणी केली जात आहे. यासाठीच गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने ‘मुंबईतच घर हवे’ या मागणीसाठी या भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.
मूळ योजना राणीबाग ते आझाद मैदान अशी होती, मात्र पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारली. तरीही कामगार, महिला, वारस आणि आंदोलक संघटना सकाळी 11 वाजता थेट आझाद मैदानावर उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे गोविंदराव मोहिते यांनी सांगितले की, “धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अदानीला शहरभर जागा दिली जाते, मिठागरांच्या जमिनी खुल्या केल्या जातात, मग आमच्यासाठीच जागेचा टाळाटाळ का?”
शिवसेना (ठाकरे गट)प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चाला स्पष्ट पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे स्वतः मोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.



