Congress Mashal Morcha : विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा मशाल मोर्चा स्थगित

•नीलेश सांबरे यांचा शिवसेना प्रवेश देखील पुढे ढकलला,पुढील तीन दिवस काँग्रेसकडून राज्यव्यापी दुखवटा जाहीर
मुंबई | अहमदाबादमध्ये गुरुवारी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने गुरुवारी नियोजित केलेला राज्यव्यापी मशाल मोर्चा तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काँग्रेसकडून पुढील तीन दिवस राज्यभर दुखवटा पाळण्याची घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित गडबडीच्या निषेधार्थ गुरुवारी जनजागृतीसाठी मशाल मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, देशाला हादरवून टाकणाऱ्या विमान अपघातामुळे हा मोर्चा रद्द करण्यात आला असून, काँग्रेसने अपघातात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान, जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे यांचा आज ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा शिवसेना प्रवेशही पुढे ढकलण्यात आला आहे. सांबरे यांचा पक्षप्रवेश सोहळा लवकरच नव्याने जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.


