
Pune Ajit Pawar Ganpati Visit Canceled : गणेश मंडळांच्या भेटीचा कार्यक्रम शेवटच्या क्षणी स्थगित, पुणे सोडून मुंबईकडे रवाना
पिंपरी-चिंचवड :- उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचा आजचा पिंपरी-चिंचवड दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने त्यांच्या समर्थकांचा मोठा हिरमोड झाला आहे. शहरातील जवळपास 40 गणेश मंडळांना भेट देऊन दर्शन घेण्याचा त्यांचा नियोजित कार्यक्रम होता, मात्र अचानकपणे ते मुंबईला रवाना झाले.
अजित पवार दुपारी 12.30 वाजता शहरात येणार होते, पण पावणे दोन वाजता ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल यांनी दिली. “काही कारणास्तव दादांचा दौरा रद्द झाला आहे. शहरातील मंडळांना भेट देण्याचा कार्यक्रम सध्या स्थगित करण्यात आला आहे,” असे त्यांनी सांगितले.
अजित पवारांच्या स्वागतासाठी शहरातील अनेक प्रमुख मंडळांनी जय्यत तयारी केली होती. मंडपाची सजावट, बॅनरबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मात्र, दौरा रद्द झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. “दोन दिवसांपासून आम्ही स्वागताची तयारी करत होतो, पण ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाल्याने निराशा झाली,” अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
पुढील निवडणुका लक्षात घेऊन काही कार्यकर्त्यांनी या दौऱ्यातून राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याची तयारीही केली होती. मात्र, दौरा रद्द झाल्याने त्यांचेही प्रयत्न फोल ठरले. अजित पवारांनी दौरा अचानक का रद्द केला, याचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही, पण या निर्णयामुळे शहरातील गणेश मंडळांचा उत्साह थोडा कमी झाल्याचे दिसून येत आहे.



