
Sion Pratiksha Nagar Rain Update : प्रतीक्षा नगरमधील 30-35 घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी; रहिवाशांच्या सामानाचे मोठे नुकसान
मुंबई :- मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शीव, प्रतीक्षा नगर येथील म्हाडाच्या बैठ्या संक्रमण शिबिरातील सुमारे 30 ते 35 घरांमध्ये पाणी शिरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून रहिवाशांच्या घरात पाणी साचले असून, मंगळवारी पाण्याची पातळी वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय झाली असून, घरातील वस्तूंचेही मोठे नुकसान झाल्याचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी सांगितले.
तात्काळ स्थलांतराची व्यवस्था
ही घटना लक्षात येताच, म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे अधिकारी तातडीने प्रतीक्षा नगर येथील संक्रमण शिबिरात पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून, पात्र रहिवाशांना नवीन संक्रमण शिबिरातील गाळ्यांमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच, घुसखोर रहिवाशांबाबतही योग्य तो निर्णय घेऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
स्थलांतर रखडल्याने संकट
माहितीनुसार, या बैठ्या संक्रमण शिबिरातील बहुतांश रहिवाशांना पूर्वीच नवीन इमारतींमध्ये हलवण्यात आले होते. मात्र, ज्या 30-35 घरांमध्ये पाणी शिरले आहे, त्या रहिवाशांचे स्थलांतर पात्रता, अपात्रता आणि घुसखोरीच्या मुद्द्यांमुळे रखडले होते. परिणामी, आता अतिवृष्टीमुळे त्यांना या संकटाचा सामना करावा लागत आहे.


