
Maharashtra Mumbai Election News : आज केवळ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता
मुंबई :- राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये घेण्याची योजना आखली जात असून, यात नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महापालिकांचा समावेश असणार आहे.
तीन टप्प्यांत निवडणुका
पहिला टप्पा: यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होतील. आज (4 नोव्हेंबर) होणाऱ्या पत्रकार परिषदेत केवळ याच निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगरपरिषदा आणि एकूण 42 नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या टप्प्यात नोव्हेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.
दुसरा टप्पा: या टप्प्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी मतदान घेतले जाईल. यासाठी डिसेंबरमध्ये मतदान घेतले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तिसरा आणि अंतिम टप्पा: या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
निवडणुका पुढे ढकलण्याचे कारण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागात मदतकार्यात व्यस्त असल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका थोड्या पुढे ढकलल्या जात आहेत.
सर्वोच्च न्यायालयाची मुदत
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदत दिली आहे. महानगरपालिका निवडणुका या मुदतीपूर्वी, अंदाजे 10 दिवस आधी पार पाडल्या जाण्याची शक्यता आहे.
आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोग नेमकी कोणती घोषणा करतो आणि या टप्प्यांनुसार निवडणुका जाहीर होतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.



