मुंबईठाणे
Trending

Sanjay Raut : “शिवसेना आता भाजपच्या दारात जागा मागतेय, हे लाजीरवाणं!” संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर घणाघाती प्रहार

Sanjay Raut On Eknath Shinde : मराठी माणसाची लाचारी दिसतेय; मुंबईत 60 वर्षांत पहिल्यांदाच शिवसेना भाजपसमोर झुकल्याची राऊतांची टीका

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या Mumbai BMC Election रणधुमाळीत ठाकरे आणि शिंदे गटातील वाकयुद्ध आता शिगेला पोहोचले आहे. महायुतीमधील जागावाटपावरून शिवसेना (UBT) नेते खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “ज्या शिवसेनेने 60 वर्षे भाजपला आपल्या मर्जीनुसार जागा दिल्या, ती शिवसेना आज भाजपच्या दारात जागा मागण्यासाठी उभी आहे, हे हास्यास्पद आणि धक्कादायक आहे,” असे विधान राऊतांनी केले आहे.

‘भाजपने फेकलेल्या जागांवर निवडणूक लढवतायत’

जागावाटपाच्या मुद्द्यावरून बोलताना संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे स्वतःला शिवसेना म्हणवून घेतात, पण त्यांना जागावाटपासाठी अमित शहांच्या दारात जावे लागले. भाजपने ज्या काही फेकलेल्या जागा दिल्या आहेत, त्यावर हे लोक आता निवडणूक लढवत आहेत. 60 वर्षांच्या इतिहासात शिवसेना कधीही कुणाच्या दारात उभी राहिली नव्हती, पण आज या लोकांनी मराठी माणसाची लाचारी जगाला दाखवून दिली आहे.”

ठाकरे-मनसे युतीचा ‘सन्मान’

यावेळी राऊतांनी ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीचा गौरव केला. “आम्ही सन्मानाने आघाडी केली आहे. शिवसेना ठाकरे गट जवळपास 140 जागा लढवत असून राज ठाकरे यांचा पक्षही मोठ्या ताकदीने मैदानात आहे. आम्ही राष्ट्रवादीलाही (शरद पवार गट) योग्य जागा देत आहोत. आमची युती सन्मानाची आहे, लाचारीची नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

‘शिंदेंनी मराठी माणसाचे नाव घालवले’

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर प्रहार करताना म्हटले की, “ज्या ज्या वेळी भाजपने शिवसेनेवर वरचढ होण्याचा प्रयत्न केला, त्या त्या वेळी शिवसेना स्वाभिमानाने बाजूला झाली. मात्र, आताचे नेते केवळ सत्तेसाठी भाजपचे मांडलिक झाले आहेत. शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भाजपच्या तुकड्यांवर निवडणूक लढत आहेत, हे पाहून वाईट वाटते.”

जनताच धडा शिकवेल: राऊतांचा दावा

मुंबईची जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहे आणि योग्य वेळी याचा विचार नक्की करेल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. “मुंबईत शिवसेनेची मर्जी चालायची, पण आता भाजपच्या मर्जीने जागा दिल्या जात आहेत. हे मराठी माणसाचे दुर्दैव आहे,” असेही ते पुढे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0