मुंबई

Virar Crime News : ‘वर्क फ्रॉम होम’चं आमिष… आणि 9.65 लाखांची ऑनलाईन लूट!

•टेलिग्रामवरून ‘गोल्ड बिडिंग टास्क’; दिल्लीतून आरोपीला बोळींज पोलिसांची फिल्मी स्टाईल अटक

विरार | सोशल मिडियावर ‘वर्क फ्रॉम होम’चं आमिष दाखवत, टेलिग्रामच्या माध्यमातून तब्बल 9 लाख 65 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील सायबर गुन्हेगाराला बोळींज पोलिसांनी रोमहर्षक शोधमोहीम राबवत अटक केली आहे. आरोपीने खोट्या वेबसाईट्स, बनावट टास्क आणि आकर्षक परताव्याचं नाट्य रचून अनेकांना गंडा घातला होता. या कारवाईने सायबर गुन्हेगारांच्या टोळींच्या मुसक्या आवळण्याची दिशा स्पष्ट झाली आहे.

विरार पश्चिमेतील रहिवासी निलेश पाटील यांच्याशी ऑक्टोबर 2024 मध्ये ‘MalavikaAvinash’ या टेलिग्राम आयडीवरून संपर्क साधण्यात आला. ‘MMTC-PAMP’ कंपनीच्या वर्क फ्रॉम होम ऑफरचे आमिष देत त्यांना ऑनलाइन टास्कसाठी बनावट लिंक देण्यात आली. सुरुवातीला काही टास्क पूर्ण केल्यावर परताव्याच्या स्वरूपात पैसे खात्यात आल्याने त्यांचा विश्वास बसला. मात्र त्यानंतर ‘गोल्ड’, ‘प्लॅटिनम’, ‘डबल प्लॅटिनम’ अशा झगमगत्या शब्दांच्या आड लपून आरोपींनी तब्बल 9 लाख 65 हजार 577 रुपयांची रक्कम ओढली.

8 दिवसांची श्वास रोखणारी शोधमोहीम; दिल्लीच्या गल्लीतील सायबर गुन्हेगार अखेर जेरबंद

बोळींज पोलिसांनी सायबर विश्लेषण आणि तांत्रिक तपास करताना फसवणुकीचा पैसा फेडरल बँक, आरबीएल बँक, बंधन बँकेच्या विविध खात्यांत जमा झाल्याचा तपशील मिळवला. विशेष म्हणजे आरबीएल बँक, रोहिणी (दिल्ली) येथून 3.5 लाख रुपये चेकने, तर 50 हजार रुपये रोख रक्कम एटीएममधून काढण्यात आल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे रामपुरा, दिल्ली येथील विशाल जगतसिंह खुबड (वय 28) यास ओळखले आणि दिल्लीच्या गल्लीबोळांत 8 दिवस ससेमिरा घालून शेवटी 21 एप्रिल 2028 रोजी त्याला अटक केली.

या कारवाईत पोलिसांची ‘डिटेक्टिव्ह’ शैली दिसून आली. आरोपीने बनावट पत्ते वापरून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र तपासकऱ्यांनी मोबाईल सिग्नल्स आणि आर्थिक व्यवहारांची साखळी पकडून अखेर आरोपीपर्यंत पोहोच घेतली.

ही थरारक कारवाई पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पार पाडली. या मोहिमेत प्रकाश सावंत, किरण वंजारी, विष्णू वाघमोडे, जनार्दन मते, किशोर धनू, विलास पवार, रोशन पुरकर आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलिसांनी याप्रकरणी इतर सहआरोपींचा शोध सुरू ठेवला असून, नागरिकांना टास्क, गुंतवणूक, मोठा परतावा या गोंडस आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago