Virar Crime News : विरारच्या जंगलात ‘दारूचा कारखाना’ उद्ध्वस्त; लाखो रुपयांचा ‘वॉश’ जागेवरच नष्ट

Virar Police Busted Daru Adda : बरफपाडा परिसरात पहाटे कारवाई, तब्बल 1,200 लिटर दारूचा कच्चा माल जप्त; एका महिलेवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा
विरार :- विरार पूर्व परिसरातील जंगलतोड आणि बेकायदेशीर धंद्यांवर अंकुश लावण्यासाठी सक्रिय असलेल्या गुन्हे शाखा कक्ष-3 (विरार) ने एका मोठ्या गावठी हातभट्टीवर छापा मारून लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. विशेष म्हणजे, ही दारूची भट्टी एका महिलेकडून चालवली जात होती. Virar Police News
विरार पूर्वेकडील चंदनसार, बरफपाडा येथील घनदाट जंगलामध्ये पाण्याचे ओहळालगत मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर, दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस पथकाने या दुर्गम भागामध्ये धडक कारवाई केली.
मोठा साठा नष्ट
पोलिसांनी छापा मारला असता, जंगलात चुलीवर दारू बनविण्यासाठी लागणाऱ्या विविध साधनांचा वापर सुरू असल्याचे दिसून आले. या कारवाईत पोलिसांनी त्वरित 1,150लिटर ‘वॉश’ (हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल), 50 लिटर तयार गावठी दारू आणि दारू निर्मितीचे साहित्य असा एकूण 1 लाख 22 हजार 850 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आणि जागेवरच नष्ट केला.
तपासादरम्यान, ही हातभट्टी हरकू पागी (रा. बरफपाडा) नावाच्या महिलेची असून ती स्वतः हे बेकायदेशीर काम करत असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी तिच्याविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे विरार परिसरातील बेकायदेशीर दारू निर्मिती करणाऱ्या धंद्यांना मोठा झटका बसला आहे.



