मुंबई

Virar Crime News : घरफोडीची टोळी जेरबंद! – विरारमध्ये ‘छत उचकटून’ चोरी करणारे 4 आरोपी अटकेत; कल्याण, ठाण्यासह 5 गुन्हे उघड

•चोरट्यांकडून 4.56 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; अस्पष्ट सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी लावला छडा

विरार :- विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्टील कारखान्याचे छत उचकटून चोरी करणाऱ्या आणि परिसरातील विविध भागांत घरफोडी करणाऱ्या एका सराईत टोळीला विरार पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी या टोळीतील 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण 4.56 लाख रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे विरारसह कल्याण आणि कोळसेवाडी (ठाणे) येथील एकूण 5 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

अशी झाली चोरीची घटना

दिनांक 18 ते 19 नोव्हेंबर 2025 च्या रात्रीच्या दरम्यान सुरेशकुमार शहा यांच्या स्टील भांडी बनवण्याच्या कारखान्यात ही घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी कारखान्याच्या मागील बाजूच्या गाळ्याचे छत उचकटले आणि आतमधील स्टीलचे साहित्य भरलेल्या गोणी चोरून नेल्या होत्या. या गंभीर घटनेनंतर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांची तपास मोहीम

घरफोडीच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक वाहन आणि त्यामधून 3 ते 4 संशयित इसमांच्या अस्पष्ट हालचाली दिसून आल्या.

पोलिसांनी तांत्रिक कौशल्य आणि विश्वासातील गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपी अजय किरण शाह (वय 20) याला दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी अटक केली. अजय शाह याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने त्याचे साथीदार शंकर हाल्या दिवा, रोहन राम्या पारधी आणि एका अल्पवयीन मुलासह मिळून हे गुन्हे केल्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी चोरी केलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून, त्यांच्या अटकेमुळे विरार पोलीस ठाण्यातील 3 कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील 1, आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील 1, असे 5 गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस उप आयुक्त सुहास बावचे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0