Virar Crime Branch : 5 मिनिटांत कार गायब करणारा ‘हायटेक’ चोर विरार गुन्हे शाखेच्या जाळ्यात! 53 गुन्हे नोंद असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

Virar Latest Crime News : स्कॅनर मशिनने कोड डिकोड करून बनावट चावी बनवण्यात होता पटाईत; नालासोपारा, मुंबईसह 53 ठिकाणी केला डल्ला
विरार/नालासोपारा | नालासोपारा परिसरातून चोरीला गेलेल्या एका स्विफ्ट कारचा तपास करताना विरार गुन्हे शाखा कक्ष 3 Virar Crime Branch Unit 3च्या पथकाने एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. मोहम्मद तौफीक हबिबुल्लाह असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्यावर एकट्या महाराष्ट्रात 53 गुन्हे नोंद आहेत. Virar Latest Crime News
चोरीची मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावले
हा आरोपी केवळ चोर नसून तांत्रिकदृष्ट्या अत्यंत निष्णात आहे. तो रात्रीच्या वेळी रस्त्याकडेला उभी असलेली कार हेरायचा. सायरन वाजू नये म्हणून तो दरवाजा न उघडता हातोडीने को-ड्रायव्हर साईडची काच फोडून खिडकीतून आत प्रवेश करायचा. त्यानंतर कारचे डॅशबोर्ड सर्किट डिस्कनेक्ट करून सायरन कायमचा बंद करायचा.
सर्वात धक्कादायक म्हणजे, तो ‘ओबीडी स्टार’ नावाच्या आधुनिक स्कॅनर मशिनला वाय-फायने कनेक्ट करायचा आणि कारचा कोड डिकोड करून अवघ्या 5 ते 10 मिनिटांत नवीन डुप्लिकेट चावी तयार करून कार घेऊन पसार व्हायचा.
तपास आणि अटकेची कारवाई
जानेवारी महिन्यात नालासोपारा येथील अजय मौर्य यांची स्विफ्ट कार चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखेने सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे मोहम्मद तौफीक याला कल्याणच्या पलावा सिटीमधून 3 फेब्रुवारी रोजी अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून, चोरीच्या गाड्या विकत घेणारा विरेंद्र शर्मा याला गुजरातच्या गांधीनगरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
मोठा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी आरोपीकडून चोरीची स्विफ्ट कार, गुन्ह्यासाठी वापरलेली वॅगनार कार आणि मोटारसायकल जप्त केली आहे. याशिवाय त्याच्या घरातून 22 कारच्या चाव्या, स्कॅनर मशिन, हातोडी, कटर, आणि वेगवेगळ्या गाड्यांच्या नंबर प्लेट्स असा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. तपासात असे निष्पन्न झाले की, त्याने गुन्ह्यासाठी वापरलेली वॅगनार कार देखील कल्याणच्या खडकपाडा परिसरातून चोरी केली होती.
अनेक राज्यांत होता ‘पाहिजे’
मोहम्मद तौफीक हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेशातील 4 गुन्ह्यांतही फरार होता. मुंबई न्यायालयाने त्याच्याविरुद्ध ‘प्रोक्लेमेशन वॉरंट’ काढले होते. त्याच्या अटकेमुळे नालासोपारा आणि इतर भागातील किमान 4 गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली आहे.



