मुंबई

Vijay Wadettiwar : “ना हनी, ना ट्रॅप – पण सत्तेचा हादरा झालाच!” : हनी ट्रॅपवरून विधानसभेत आरोप-प्रत्यारोप

• “हातात सीडी आहे, पण दाखवण्यासाठी तिकीट लावावं लागेल!” – विजय वडेट्टीवारांचा दावा

मुंबई | राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅप प्रकरणाने राजकारणाचा पारा गाठला असून, सत्ताधारी व विरोधकांमध्ये तुफान आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एका बाजूला सरकारकडून “या प्रकरणात काहीच नाही” असं ठसठशीत स्पष्टीकरण देण्यात आलं असतानाच, विरोधी पक्ष नेत्यांच्या दाव्यांमुळे ही आग चांगलीच भडकली आहे.

“ना हनी आहे, ना ट्रॅप,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले. पण विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या वक्तव्यांमुळे या प्रकरणाचं गांभीर्य नव्याने अधोरेखित झालं. “आमच्याकडे सीडी आहे, पण ती दाखवायला दहा-वीस हजारांचं तिकीट लावावं लागेल, आणि फक्त खास निमंत्रितांनाच दाखवता येईल,” असा धक्कादायक दावा वडेट्टीवारांनी केला.

त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेन ड्राईव्ह विधानसभेत दाखवल्याचं सांगत, “मी ते अध्यक्षांना देणारच होतो, पण त्यांनी थांबवलं. त्यावेळी मागितलं असतं तर दिलं असतं. पण त्या माहितीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात, म्हणून आम्ही संयम पाळतोय,” असं सांगितलं.

पटोले यांनी थेट मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याचा आरोप करत, “मुख्यमंत्र्यांना एका आईचे अश्रू समजत नाहीत. मग त्यांनी सभागृहात केलेलं विधान खोटं होतं का?” असा रोखठोक सवाल केला. त्यांनी नाशिक, ठाणे, मुंबई ही हनी ट्रॅपची केंद्रं असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

“या हनी ट्रॅपमुळे राज्यातील महत्त्वाचे दस्तऐवज असामाजिक शक्तींच्या हाती गेलेत. त्यामुळे महाराष्ट्र धोक्यात आहे. पण सरकार लपवाछपवी करतेय,” असा आरोप त्यांनी केला.

vivek

Recent Posts