मुंबई

Aaditya Thackeray : ‘मातोश्री’ परिसरात ड्रोन फिरल्याने खळबळ! आदित्य ठाकरेंचा संताप; पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप

•”बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जातेय का?” एमएमआरडीए आणि सरकारला थेट सवाल; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

मुंबई :- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’ परिसरात ड्रोन फिरताना दिसल्याने शिवसेना (उबाठा) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी हा ‘बीकेसी सर्व्हे’च्या नावाखाली पाळत ठेवण्याचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप करत महायुती सरकारवर थेट निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून (पूर्वीचे ट्विटर) अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले आहे की, “बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जात आहे का? कोणता सर्व्हे एखाद्याच्या घरात डोकावण्याची आणि दिसताच लगेच पळून जाण्याची परवानगी देतो?” त्यांनी एमएमआरडीएला उद्देशून विचारले आहे की, एमएमआरडीए फक्त संपूर्ण बीकेसीसाठी आमच्या घराची देखरेख करत आहे का? तसेच रहिवाशांना या सर्व्हेबद्दल माहिती का देण्यात आली नाही, आणि पोलिसांनी परवानगी दिली असेल तर रहिवाशांना का कळवले नाही, असेही त्यांनी विचारले आहे. एमएमआरडीएने जमिनीवर उतरून त्यांच्या कामाच्या बनावटीवर लक्ष केंद्रित करावे, जसे की एमटीएचएल (अटल सेतू) जे त्यांच्या भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

या घटनेवर शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘मातोश्रीवर पाळत ठेवण्याचा हा प्रकार आहे का?’ असा संतप्त सवाल केला आहे. अंधारे यांनी ‘मातोश्री’च्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या नेत्यांना आणि अनेक गुन्हेगारांना सुरक्षा देण्यात आली असताना, मुद्दाम ‘मातोश्री’च्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आल्याचा आरोप केला आहे. “जर काही झाले तर ती जबाबदारी कुणाची आहे?” असा प्रश्न विचारत त्यांनी ‘हे सगळे वाईट संस्कार भाजपचे आहेत,’ अशी टीका केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0