•भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे उडाला आगीचा भडका; चेंगराचेंगरीत चिमुरडीचा पाय फ्रॅक्चर, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा संताप
जेजुरी | जेजुरी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित उमेदवारांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे उधाण आले होते. ‘येळकोट येळकोट घेरी मल्हार’च्या जयघोषात जेजुरी गडाचा पायथा आणि नंदी चौक परिसर पिवळ्या धमक भंडाऱ्याने न्हाऊन निघाला होता. मात्र, याच जल्लोषात भंडाऱ्यामध्ये असलेल्या ज्वलनशील भेसळीमुळे अचानक आगीचा गोळा निर्माण झाला. या आगीत दोन नवनिर्वाचित नगरसेवकांसह जवळच उभ्या असलेल्या महिला आणि बालकांना आगीच्या झळा बसल्या.
दुर्घटना नेमकी कशी घडली?
निकालात विजयी झालेले उमेदवार आणि त्यांचे समर्थक गडाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होण्यासाठी जमले होते.परंपरेप्रमाणे महिला औक्षण करत असताना आणि कार्यकर्ते भंडाऱ्याची उधळण करत असतानाच, भंडाऱ्याचा दिव्याशी संपर्क आला आणि क्षणात आगीचा मोठा भडका उडाला. या भडक्यामुळे परिसरात एकच हाहाकार उडाला. आगीपासून वाचण्यासाठी लोकांनी धाव घेतली, मात्र नंदी चौक परिसरात असलेल्या प्रचंड अतिक्रमणामुळे लोकांना पळायला जागा मिळाली नाही. या चेंगराचेंगरीत एका 10 वर्षीय मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला असून जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भेसळयुक्त भंडाऱ्याचा ‘सैतान’
जेजुरीत मिळणाऱ्या भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक आणि ज्वलनशील पदार्थांची भेसळ केली जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी केली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) वारंवार दाद मागूनही कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जेजुरी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून, गडावर अशा प्रकारचा भेसळयुक्त भंडारा आणण्यास बंदी घालणारे फलक लावणार असल्याचे सांगितले.
प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
जेजुरीतील अरुंद रस्ते आणि त्यावर असलेले विक्रेत्यांचे अनधिकृत स्टॉल्स यामुळे कालच्या दुर्घटनेची तीव्रता वाढली. जर नगरपालिकेने वेळीच ही अतिक्रमणे हटवली असती, तर चेंगराचेंगरी टाळता आली असती, अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेमुळे विजयाचा आनंद असलेल्या जेजुरीत आता भीती आणि संतापाचे सावट असून, जिल्हा प्रशासन यावर काय ठोस पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…