Vasant More : मी लोकसभेसाठी इच्छुक होतो
•इतर पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन आले आहे, येत्या दोन-तीन दिवसात निर्णय घेणु
पुणे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी काल पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. “मी लोकसभेसाठी इच्छूक होतो. हे मी दोन वर्षांपासून वारंवार सांगत आलो आहे. मी जर इच्छूक होतो तर पुण्यातील पक्ष संघटनेने राज ठाकरेंकडे नकारात्मक अहवाल का पाठवला?” असा सवाल वसंत मोरे यांनी आज पत्रकार परिषदेतून उपस्थित केला. “मी कोणत्याही पक्षाच्या ऑफरसाठी मनसेचा राजीनामा दिलेला नाही. मनसेमध्ये वातावरण चांगलं नसतानाही मी त्या पक्षात होतो. त्यामुळे इतर पक्षांकडून ऑफर आली म्हणून मी बाहेर पडणारा कार्यकर्ता नाही. मी सामान्य पुणेकरांसाठी लोकसभा निवडणूक लढविणार आहे”, असेही मोरे यांनी जाहीर केले. Vasant More
वसंत मोरे काय म्हणाले?
मनसेमधून मला अनेकांचे फोन आले. राज साहेबांचाही फोन एका पदाधिकाऱ्याच्या मोबाइलवर आला होता, असं वसंत मोरे यांनी सांगितलं. “पण त्या पदाधिकाऱ्याला मी एवढंच सांगितलं की, मी हात जोडतो. पण साहेबांचा फोन मला देऊ नको. कारण आजवर संघटनेतील खरी परिस्थिती मी राज ठाकरे यांच्या कानावर घालत आलो होतो. त्यामुळे आता राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्याशी बोलून मी त्यांना दुखवू इच्छित नाही”, अशी भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केली.मनसेचा राजीनामा दिल्यानंतर मला अनेक पक्षातील नेत्यांचे फोन आले. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातूनही मला संपर्क केला गेला. पण सर्वच पक्षांना मी सांगितलं की, सध्यातरी मी कोणतीही राजकीय भूमिका जाहीर करणार नाही. कारण मला ज्या त्रासातून पक्ष सोडावा लागला, त्यानंतरही ते लोक शहाणे झालेले नाहीत, ते आतादेखील माझ्या कार्यकर्त्यांना रात्री-अपरात्री फोन करून धमकावत आहेत. या सर्वातून स्थिर स्थावर झाल्यानंतर दोन दिवसांनी राजकीय भूमिका जाहीर करेल.”, असे वसंत मोरे यांनी सांगितलं. Vasant More