ठाणेमुंबई
Trending

Avinash Jadhav : ‘कोंबडा बनवणार’ मनसेचा इशारा मिळताच ‘माही खान’ची माघार! मराठी भाषेवरून वाद घालणाऱ्याची माफी

Avinash Jadhav On Mahi Khan : विमानात मराठी बोलण्यास विरोध केल्याचा व्हिडिओ व्हायरल; मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला होता थेट इशारा

मुंबई :- विमानात एका महिलेला मराठी बोलण्यास विरोध करत, तिचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून वाद निर्माण करणाऱ्या माही खान नावाच्या व्यक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अविनाश जाधव यांनी दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर काही तासांतच त्याने माफी मागितली आहे.

नेमके काय घडले?

माही खान या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला होता. विमानात एका महिलेने ‘हळू-हळू भाऊ’ असे मराठीत म्हटल्यामुळे, “मला मराठीत का बोलले?” असा वाद त्याने घातला आणि व्हिडिओ बनवून प्रसारित केला. या व्हिडिओमुळे संबंधित महिलेची बदनामी झाली असून, त्यांना आपली नोकरी गमवावी लागल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे.

अविनाश जाधव यांचा संताप आणि इशारा

मनसे नेते अविनाश जाधव यांनी संबंधित महिलेला मनसे कार्यालयात बोलावून प्रकरण जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी माही खानवर तीव्र संताप व्यक्त केला:

“या भिकारड्याने फक्त व्ह्यूज आणि पैसे कमविण्यासाठी महिलेचा जॉब घालवला. आम्ही त्याला सोडणार नाही. यांच्या आजोबा, बापाला आम्ही पोसले आहे आणि तरीही मराठी बोलले जाणार नाही असे म्हणत असेल तर कान पकडून मराठी बोलायला लावीन. याला शोधून कोंबडा बसविला नाही तर माझे अविनाश जाधव नाव नाही.”

इशारा मिळताच मागितली माफी

अविनाश जाधव यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आणि ‘कोंबडा बनवणार’ या इशाऱ्यानंतर माही खानने तातडीने माघार घेतली. त्याने एक नवीन व्हिडिओ प्रसारित करून मराठी जनतेची माफी मागितली आहे.

तो म्हणाला, “मी संबंधित व्हिडिओ डाऊन केला आहे. मला कोणालाही दुखवायचे नव्हते. मराठी जनतेला वाईट वाटेल असे मला करायचे नव्हते. माझ्या व्हिडिओमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. मी जिथे राहतो तेथील संस्कृतीचा आदर करण्यावर विश्वास ठेवतो. मी मुंबईत येत असतो, जय महाराष्ट्र!”

मनसेच्या कडक भूमिकेमुळे आणि इशाऱ्यानंतर मराठी भाषेवरून वाद घालणाऱ्या व्यक्तीला तातडीने माघार घ्यावी लागल्याने जाधव यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0