Vasai Police News : गुंतवणुकीपूर्वी सायबर सुरक्षेचे कवच घ्या; वसईत पोलिसांकडून गुंतवणूकदारांना मोलाचे मार्गदर्शन

Vasai Police Cyber Crime Awareness : दत्तानी मॉलमध्ये सायबर जनजागृती मोहीम: ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
Vasai Police News l मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सामान्य नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या जनजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून वसई पूर्व येथील दत्तानी मॉलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘आयसीआयसीआय’ (ICICI) बँकेच्या वतीने आयोजित ‘इन्व्हेस्टर अवेअरनेस’ (गुंतवणूकदार जागरूकता) कार्यक्रमात सायबर पोलिसांनी नागरिकांना ऑनलाईन फसवणुकीचे विविध प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याच्या पद्धती सविस्तरपणे समजावून सांगितल्या.

पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून आणि पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे यांनी उपस्थित 70 हून अधिक श्रोत्यांना सध्याच्या काळात वाढलेल्या सायबर गुन्ह्यांची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या बनावट साईट्स, व्हॉट्सॲप ग्रुप्स, अधिक नफ्याचे आमिष दाखवणाऱ्या बनावट जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूक यावर प्रकाश टाकला.
यावेळी पोलिसांनी पीपीटी (PPT) सादरीकरणाद्वारे फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात आणि सोशल मीडियाचा वापर करताना कोणती शिष्टाचार पाळावेत, याचे मार्गदर्शन केले. “जर कोणाची ऑनलाईन फसवणूक झालीच, तर तात्काळ कुठे आणि कशा प्रकारे तक्रार नोंदवावी,” याची तांत्रिक माहितीही यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले नवीन शर्मा यांनी गुंतवणुकीचे फायदे आणि धोके यावर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे पोलिसांनी अत्यंत समाधानकारक निरसन केले.
बँकेच्या व्यवस्थापिका ऐश्वर्या मोहोल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सायबर गुन्हे जनजागृती संदर्भातील पत्रकांचे वाटपही करण्यात आले.


