Vasai Police News : वसईच्या खारटणात पोलिसांचा ‘हातोडा’! झाडाझुडपांतील गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त; 7,100 लिटर रसायनासह 4 लाखांचा मुद्देमाल खाक

Vasai Police Take Action Against Illgeal Alcohol Smugglers : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई; झाडाझुडपांतील हातभट्टी शोधून काढली, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
वसई | वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांना ‘ओलं’ करण्याची तयारी करणाऱ्या दारू माफियांना पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. अमली पदार्थ विरोधी कक्ष-2 च्या पथकाने भुईगाव खुर्द येथील खारटण परिसरात छापा टाकून चक्क झाडाझुडपांच्या आडोशाला सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत 7,100 लिटर कच्चे रसायन आणि दारू बनवण्याचे साहित्य असा एकूण 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जागीच नष्ट केला असून दोन सराईत इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Vasai Police News
दुर्गम भागात रसायनाचा पूर;पोलिसांची गुप्त मोहीम फत्ते
निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध दारू विक्री आणि निर्मिती रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी दिलेल्या विशेष आदेशाचा परिणाम आता जमिनीवर दिसू लागला आहे. 8 जानेवारी रोजी अमली पदार्थ विरोधी कक्षाचे पथक गस्तीवर असताना, भुईगाव खुर्दच्या खारटण भागात खाडीकिनारी असलेल्या झुडपांमध्ये काहीतरी काळंबेरं सुरू असल्याची खबर त्यांना मिळाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता या दुर्गम भागात शोधमोहीम सुरू केली. समोरचे दृश्य पाहून पोलीसही अवाक झाले; तिथे विटांच्या चुली मांडून आणि मोठमोठ्या निळ्या ड्रममध्ये 7,100 लिटर रसायनाचा साठा करून मोठ्या प्रमाणावर दारू गाळण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
दोघांविरुद्ध गुन्हा, 4.30 लाखांची मालमत्ता मातीमोल
याप्रकरणी पोलिसांनी रानगाव येथील नारायण काशिनाथ वैती आणि भुईगाव येथील प्रमोद अरुण किणी या दोघांविरुद्ध वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कारवाई दरम्यान जप्त केलेले रसायन आणि ॲल्युमिनियमची सतेली तसेच इतर साहित्य अतिशय दुर्गम भागात असल्याने, पोलिसांनी पंचनामा करून सर्व मुद्देमाल जागीच नष्ट केला. 4 लाख 30 हजारांचे हे रसायन नष्ट झाल्यामुळे वसईतील अवैध दारू वितरणाच्या साखळीला मोठा तडा बसला आहे.
निवडणुकीपूर्वी पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळ आणि त्यांच्या पथकाने ज्या शिताफीने ही हातभट्टी शोधून काढली, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे अवैध धंदे डोके वर काढू नयेत, यासाठी वसई-विरार पट्ट्यात पोलिसांची गस्त आता अधिक तीव्र करण्यात आली आहे.



