मुंबईठाणे
Trending

Sanjay Raut : मुंबईत ‘मराठी अस्मिता’ विरुद्ध ‘भाजपचा अजेंडा’; कृपाशंकर सिंहांच्या वल्गनेवर संजय राऊतांचा जळजळीत प्रहार!

Sanjay Raut On Krupa Shankar : “मराठी माणसाचे डोके फोडण्याचा भाजपचा डाव”; राहुल नार्वेकरांच्या ‘कमळ’ उपरण्ण्यावरूनही राऊतांनी झाडले तोफगोळे

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) रणधुमाळीत आता ‘अमराठी महापौर’ या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी “यंदा मुंबईचा महापौर उत्तर भारतीय असेल,” असे विधान केल्यानंतर, शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला. “भाजप हा जाणीवपूर्वक मराठी माणसाचे मुंबईतील महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत असून, हा केवळ कृपाशंकर सिंहांचा नव्हे, तर भाजपचा छुपा अजेंडा आहे,” असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

भाजपचा ‘बोलका पोपट’ आणि अमराठी महापौराचे कारस्थान

संजय राऊत यांनी कृपाशंकर सिंह यांचा उल्लेख भाजपचा ‘बोलका पोपट’ असा केला. “मुंबईत मराठी माणसाचे डोके फोडण्याचा हा भाजपचा सुनियोजित डाव आहे. कृपाशंकर सिंह यांनी केलेले विधान अनावधानाने आलेले नाही, तर ती एक चाचपणी आहे. भाजपला मुंबईसह संपूर्ण राज्यात अमराठी वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे,” असे राऊत म्हणाले. “महाराष्ट्राच्या निर्मितीच्या लढ्यात भाजपचा कुठेही संबंध नव्हता. आता केवळ परप्रांतीयांची मते मिळवण्यासाठी ही कारस्थाने रचली जात आहेत. मराठी माणसाच्या तोंडावर पिचकारी मारण्यासाठी कृपाशंकर यांना हे काम दिले आहे का?” असा जळजळीत सवालही त्यांनी उपस्थित केला.

विधानसभा अध्यक्षांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह

कुलाबा मतदारसंघात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांना धमकावल्याचा आरोप होत आहे. यावर राऊत यांनी नार्वेकरांवर जोरदार टीका केली. “राहुल नार्वेकर हे विसरले आहेत की ते एका घटनात्मक पदावर, विधानसभेच्या अध्यक्षपदावर आहेत. त्यांनी राजकीय कार्यक्रमात कमळाचे उपरणे टाकून मिरवणे हे संकेतांना धरून नाही. ते स्वतःच्या घरातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी गेले आणि तिथे त्यांनी विरोधकांना धमकावले. या राज्यात नियम आणि कायद्याची विचारण्याची सोयच उरली नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

5 कोटी आणि 10 कोटींचे ‘एबी फॉर्म’ पॅकेज?

निवडणुकीत पैशांच्या वापरावरून राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. “भाजप आपल्या उमेदवारांना ‘एबी फॉर्म’सोबत 5 कोटी रुपये देत आहे, तर शिंदे गट 10 कोटी रुपये पुरवत आहे,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला. आमच्या पक्षात काही बंडखोरी झाली असली तरी कुणीही ‘तमाशा’ केला नाही, अनेकांनी समजुतीने अर्ज मागे घेतले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनसे-ठाकरे गटाचा उद्या संयुक्त जाहीरनामा

राजकीय घडामोडींची माहिती देताना राऊत म्हणाले की, उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा संयुक्त ‘वचननामा’ प्रसिद्ध होईल. या वचननाम्यासाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे मेहनत घेत आहेत. “येत्या काही दिवसांत मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि मीरा-भाईंदरमध्ये दोन्ही बंधूंच्या संयुक्त सभा होतील. नवीन दमाचे नेतृत्व या निवडणुकीत मोठे परिवर्तन घडवेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0