मुंबई

Vasai Crime News : थरारक पाठलाग! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम 48 तासांत गजाआड

•वसई गुन्हे शाखा कक्ष-2 चे यश; आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली; तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वसई :- वसई-विरार-मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष 02 (वसई) च्या पोलीस पथकाने एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या अनोळखी आरोपीला केवळ 48 तासांच्या आत अटक करून महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे.

गुन्ह्याचा तपशील

दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी तुळींज पोलीस ठाण्यात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर कोणीतरी अनोळखी इसमाने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीवरून तुळींज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64 सह पॉक्सो अधिनियम (POCSO) चे कलम 4,8,12 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पोलीस पथकाने तातडीने तपास सुरू केला.

पोलिसांची चक्रे वेगात

गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरात तपास केला असता, हा गुन्हा धुमाळनगर परिसरात घडल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी दानिश जमिल खान ऊर्फ जहिर (वय 23, रा. नवजीवन, वसई पूर्व) याला निष्पन्न केले. आरोपीला दिनांक 09 नोव्हेंबर 2025 रोजी अटक करून ताब्यात घेण्यात आले असून, त्याने चौकशीत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

उत्कृष्ट कामगिरी

पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-2 वसईचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्विनी शिंदे, पोलीस उप निरीक्षक संतोष घाडगे, अजित गिते, सहाय्यक फौजदार संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, चंदन मोरे, मनोज मोरे, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, प्रशांतकुमार ठाकुर, सचिन पाटील, जगदिश गोवारी, दादा आडके, राहूल कर्पे, दिलदार शेख, पोलीस अंमलदार अनिल साबळे, रामेश्वर केकान तसेच तुळींज पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार व त्यांचे पथक, तसेच सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी ही उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारासारख्या संवेदनशील गुन्ह्यात आरोपीला तात्काळ अटक करून वसई पोलिसांनी प्रशंसनीय कार्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0