Raj Thackeray Meet Devendra Fadnavis : बेस्टच्या पराभवानंतर राज ठाकरेंची फडणवीसांना भेट; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर दिला आराखडा!

•राजकीय भेटीच्या चर्चांना पूर्णविराम; राज ठाकरे म्हणाले, ‘शहरातील वाहतूक आणि पार्किंगच्या समस्यांसाठी भेट घेतली’
मुंबई :- बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले होते. मात्र, या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी राजकीय चर्चांना पूर्णविराम देत, ही भेट शहराच्या समस्यांशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले.
राज ठाकरे म्हणाले की, “काही महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शहर नियोजन हा माझा आवडीचा विषय आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांत सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामांमुळे शहराची परिस्थिती बिघडत आहे.” जिथे 50 माणसे राहत होती, तिथे आता 500 माणसे आली आहेत. त्यांच्या गाड्या वाढल्या, कचरा वाढला. यामुळे शहराचा बट्ट्याबोळ होत असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे, असे त्यांनी सांगितले.
या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना एक सविस्तर आराखडा सादर केला. त्यांनी काही महत्त्वाचे उपाय सुचवले. त्यात, खेळाच्या मैदानाखाली पार्किंगची जागा तयार करता येईल, जेणेकरून मैदानांचा वापरही कायम राहील, असे म्हटले. तसेच, पार्किंग आणि नो-पार्किंगच्या जागा ओळखता याव्यात यासाठी रस्ते आणि पदपथांवर विशिष्ट रंग लावण्यात यावा, अशीही सूचना केली.
वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. मद्यपान करून वाहन चालविल्याबद्दल दंडाची रक्कम वाढविल्यावर जनजागृती वाढली. त्याचप्रमाणे, बेशिस्त पार्किंगसाठी दंडाची रक्कम वाढवल्यास परिस्थिती सुधारू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “शहरं काही नियम पाळल्याशिवाय उभी राहत नाहीत. दुचाकीस्वार सिग्नल पाळत नाहीत, ही बेशिस्त हाताबाहेर गेली आहे, पण अजूनही ती नियंत्रणात आणता येऊ शकते,” असे राज ठाकरे म्हणाले.



