Varsha Gaikwad : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, जागांची अदलाबदल झाल्यास या निर्णयाचे आम्ही स्वागत करू
•काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली
मुंबई :- काँग्रेसची अपेक्षा आम्ही पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवली होती. प्रत्येक वेळी आम्ही मुंबई काँग्रेसची मागणी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना सांगितली होती. जागा वाटपाची चर्चा करताना काँग्रेस नेत्यांनी कडक भूमिका घ्यायला हवी होती, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे जागांची अदलाबदल झाल्यास या निर्णयाचे आम्ही स्वागत करू, असे देखील त्या म्हणाल्या.
वर्षा गायकवाड या नाराज असल्याची चर्चा होती. यावर त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मी पक्षाची शिस्त पाळणारी कार्यकर्ती आहे. त्यामुळे मी दिलेल्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे म्हणत त्यांनी नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न केला.
आम्ही पक्षाला आमची मागणी सांगितली होती. झूम मीटिंगमध्ये असो, प्रत्यक्ष भेटून असो तसेच पत्र लिहून देखील प्रत्येक वेळी मी माझे मत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे. मुंबईमध्ये काँग्रेस मजबूत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आम्हाला कमीत कमी तीन जागा मिळाव्या, अशी माझी भावना होती. त्या मी पक्षश्रेष्ठींना सांगितल्या होत्या. मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो.
मुंबईमध्ये पक्ष संघटना म्हणून आम्हाला काही अपेक्षा होत्या
वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या बैठकीला देखील उपस्थित राहिल्या नाहीत. सचिन सावंत यांची भेट देखील त्यांनी नाकारली. काँग्रेसच्या कोअर कमिटीचे फोन देखील त्यांनी घेतले नाहीत. त्यामुळे वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा होती. मात्र आज वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबईमध्ये पक्ष संघटना म्हणून आम्हाला काही अपेक्षा होत्या. पक्षाला प्रतिनिधित्व मिळायला हवे, असे पक्षातील प्रत्येकाला वाटत होते. महाराष्ट्र पातळीवरील नेत्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये कठोर भूमिका घ्यायला हवी होती, असे देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र, मी पक्षाचा प्रोटोकॉल मानते आणि पक्षाची शिस्त पाळते. यावेळी देशासाठी महत्त्वाची निवडणूक आहे. त्यामुळे आमच्या समोर देश हे खूप मोठे उद्दिष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता काम करेल, यात कोणतीच शंका नसल्याचेही वर्ष गायकवाड यांनी म्हटले आहे.
जागेची आदलाबदल होत असेल तर तो पक्षश्रेष्ठींनी ते नक्की करावे
मुंबई काँग्रेसमध्ये अनेक सक्षम उमेदवार आहेत. मात्र पक्षाने निर्णय घेतल्यानंतर काही निर्णय स्वीकारावे लागतात. ज्यावेळी आपण आघाडीमध्ये असतो त्यावेळी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो तर काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. सर्व गोष्टी मनासारख्या होतीलच असे नसते. मात्र, जागेची आदलाबदल होत असेल तर तो पक्षश्रेष्ठींनी ते नक्की करावे. असा निर्णय झाला तर आम्ही त्या निर्णयाचे स्वागतच करू, असे देखील वर्ष गायकवाड यांनी म्हटले आहे.