Varsha Gaikwad : खासदार वर्ष गायकवाड यांना पोलिसांकडून घरात स्थानबद्ध, नजर कैदेत
•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात मुंबई काँग्रेसकडून आंदोलन करण्याचा इशारा पोलिसांनी परवानगी नाकारली Varsha Gaikwad सह मुंबईतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध
मुंबई :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहे. त्याचपूर्वी मुंबई काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याचा इशारा तसेच परवानगी मागितली होती. परंतु पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊन परवानगी रद्द केली आहे. खासदार वर्षा गायकवाड यांना घरातच स्थानबद्ध करण्यात आले असून त्यांना नजर कैदेत ठेवले आहे. वर्षा गायकवाड सह मुंबई काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनाही स्थानबद्ध करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.वर्षा गायकवाड यांच्याबरोबरच काँग्रेसचे नेते भाई जगताप आणि नसीम खान यांना देखील पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
या संदर्भात खासदार वर्षा गायकवाड यांनी पोस्टच्या माध्यमातून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती असलेल्या अस्मितेखातर आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी व्यक्त होणे हा गुन्हा आहे का? असा प्रश्न खासदार गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. घडलेल्या घटनेचा प्रधानमंत्र्यांना आम्ही जाब विचारू नये म्हणून? हे सर्व सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
खासदार Varsha Gaikwad यांनी केलेली पोस्ट
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती असलेल्या अस्मितेखातर आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी व्यक्त होणे हा गुन्हा आहे का? आज आम्हाला रोष व्यक्त करण्यापासून रोखले जात आहे, हे नक्कीच शिवरायांचे राज्य नाही. आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे? माझ्या राहत्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आला आहे. का? कशासाठी? घडल्या घटनेचा प्रधानमंत्र्यांना आम्ही जाब विचारू नये म्हणून? आम्ही मागे हटणार नाही.. अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान का केला? महाराजांच्या पुतळा उभारणीचे काम एवढ्या निकृष्ट दर्जाचे का? कमिशन खाल्ले का? प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या १३ कोटी जनतेची जाहीर माफी मागावी.. आपल्या राजाचा अपमान झाला यावर जनतेने व्यक्त सुद्धा होऊ नये का? ही दडपशाही नाही चालणार.. शिवरायांचा महाराष्ट्र या सत्तापिपासू सरकारला कधीच माफ करणार नाही.. जय भवानी.. जय शिवाजी..!