Varsha Gaikwad : नालेसफाईत ‘हात की सफाई’? – खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप

मुंबई काँग्रेसची एसीबी चौकशीची मागणी; प्रशासनाच्या ढिसाळपणावर संताप
मुंबई :- मुंबई महापालिकेच्या नालेसफाई कामांमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी आज स्फोटक विधान केले. नालेसफाईच्या कामावर ‘एसीबी’मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चेंबूरमधील श्रमजीवी नगर, वत्सलाताई नाईक नगर आणि कुर्ल्याच्या क्रांती नगर व साबळे नगर परिसराचा त्यांनी आज पाहणी दौरा केला. या ठिकाणी नाल्यांची दुरवस्था, साचलेला गाळ आणि पूर्ण न झालेली कामे पाहून त्यांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली.


“कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात नालेसफाई झाली नाही. हे दृश्य पाहून नालेसफाई झाली की ‘हात की सफाई’ हे तुम्हीच ठरवा”, असे परखड शब्दांत त्यांनी प्रशासनावर टीका केली.
मुंबईकरांच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नका – वर्षा गायकवाड यांचा इशारा
मुंबईत मान्सून अगदी उंबरठ्यावर असताना अनेक भागांत अजूनही नालेसफाई न झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. काही ठिकाणी कामे सुरूच झालेली नाहीत, तर काही ठिकाणी गाळ आणि कचरा अजूनही तसाच पडून आहे. यामुळे येत्या पावसात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
“सत्ताधाऱ्यांचा बेजबाबदार आणि भ्रष्ट कारभार सामान्य मुंबईकरांवर अन्याय करत आहे. हे संतापजनक आणि दुःखद आहे. आम्ही या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू”, असा इशारा गायकवाड यांनी दिला.
साबळे नगर परिसरात मेट्रोच्या कामामुळे तुटलेली ड्रेनेज लाईन तातडीने दुरुस्त करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
दरम्यान, मुंबई काँग्रेसने नालेसफाई, रस्ते काँक्रिटीकरण आदी कामांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी ‘एसीबी’मार्फत करण्यात यावी, अशी अधिकृत मागणी केली आहे. दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे.


