Ulhasnagar Thackeray Group : उल्हासनगरमध्ये ‘ठाकरेंना’ धक्का, माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्ते शिवसेनेत

Ulhasnagar Thackeray Group Member Joined Shinde Group : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश; आगामी पालिका निवडणुकीची तयारी सुरू
ठाणे :- आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. आज उल्हासनगरमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाला मोठा धक्का बसला असून, माजी नगरसेवक शेखर यादव आणि माजी नगरसेविका संगीता सपकाळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या पक्षप्रवेशामुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. या कार्यक्रमात उपविभागप्रमुख विनायक खानविलकर, उपशाखाप्रमुख मिलिंद गावडे, तसेच मंगेश पालांडे, संजय भोईर, अनंता अमृते, सुनील जानवलेकर, राज पटेल, साबीर शेख, नितीन सपकाळे, शुभम सपकाळे, आयुष सपकाळे, रजा पीरजादे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत सामील झाले.




आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न
नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना एकनाथ शिंदे यांनी, “उल्हासनगरच्या विकासासाठी एकसंघपणे काम करणार आहोत,” असे सांगितले. त्यांनी आगामी निवडणुकीत पक्षाच्या बळकटीसाठी सक्रीय होण्याचे आवाहनही केले.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. विशेषतः कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर पकड पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या आठवड्यात अंबरनाथ येथील मनसेचे माजी नगरसेवक आणि शहर अध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, तर त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारीही पक्षात दाखल झाले आहेत.
हे सर्व पक्षप्रवेश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रांवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना जोरदार प्रयत्न करत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये या सर्व ठिकाणी शिवसेनेची ताकद मोठी वाढलेली दिसून येईल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, मंदार किणी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



