Ulhasnagar Crime News : ‘अधिक परताव्या’च्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाला 5.77 कोटींचा गंडा

•उल्हासनगरमध्ये ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली सायबर चोरट्यांची फसवणूक
उल्हासनगर :- शेअर बाजारात अधिकच्या परताव्याचे आमिष दाखवून उल्हासनगरमधील एका 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 5 कोटी 77 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. हा उल्हासनगर शहरातील आठवड्याभरातील तिसरा मोठा फसवणुकीचा गुन्हा आहे.
विष्णू कोटवानी (73 वय) यांना सायबर चोरट्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांना शेअर आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना ‘बीएसएसएल’ आणि ‘आरपीएमटीए’ नावाचे दोन ॲप्स मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. या ॲप्सच्या माध्यमातून कोटवानी यांना वेळोवेळी पैसे भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी टप्प्याटप्प्याने 5 कोटी 77 लाख 2 हजार रुपये गुंतवले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोटवानी यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आशिष कुमार, इशिता कपूर आणि अद्विक शर्मा या तीन व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. इतक्या मोठ्या रकमेच्या फसवणुकीमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.


