मुंबईठाणे

Mawal Breaking News : मावळमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेसला धक्का; बापू भेगडे यांच्या समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Pune Mawal Latest News : ‘मावळ पॅटर्न’नंतर राजकीय घडामोड; बापूंचा प्रवेश नाही, पण गट भाजपसोबत

लोणावळा,मावळ :- विधानसभा निवडणुकीत मावळमधून अपक्ष म्हणून लढलेल्या बापू भेगडे यांचा प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, या पक्षप्रवेश सोहळ्यात बापू भेगडे स्वतः उपस्थित नव्हते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

कोण भाजपमध्ये सामील झाले?

सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रामदास काकडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बाबुराव वायकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष जाधव, आणि बापू भेगडे यांचे पुतणे व माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे हे प्रमुख आहेत.

याशिवाय, माजी पंचायत समिती सदस्य सचिन घोटकुले, संतोष मुऱ्हे, लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अरुण चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती अतिशराव परदेशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव असवले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

राजकीय पार्श्वभूमी

मागील विधानसभा निवडणुकीत मावळमध्ये महायुतीत बंडखोरी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले बापू भेगडे यांनी अपक्ष निवडणूक लढवून ‘मावळ पॅटर्न’ उदयास आणला होता. त्यावेळी भाजप नेते बाळा भेगडे आणि गणेश भेगडे यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. निवडणुकीत बापूंचा पराभव झाला असला तरी त्यांचा गट भाजपमध्ये सामील होईल अशी चर्चा होती. त्यानुसार, सोमवारी त्यांच्या प्रमुख समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, पण बापू भेगडे यांनी मात्र अद्याप पक्षप्रवेश केलेला नाही.

भाजप नेत्यांची प्रतिक्रिया

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्याची प्रगती होत आहे. भाजपच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवूनच या सर्वांनी पक्षात प्रवेश केला आहे.” भाजपची विचारधारा ही व्यक्तिनिष्ठ नसून पक्षाच्या विचारधारेवर प्रत्येक कार्यकर्ता काम करतो आणि याच विचारधारेमुळे आपल्याला विजय मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी, “आम्ही या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करू,” असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0