Uddhav Thackeray On Raj Thackeray Yuti : ठाकरे बंधूंच्या युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब; ‘मराठी माणसावर वाकडी नजर टाकणाऱ्यांचा खात्मा करणार’
मुंबई | “आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत. आम्ही एकत्र आलो आहोत ते केवळ निवडणुकीसाठी नाही, तर कायमचे एकत्र राहण्यासाठीच,” अशा शब्दांत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी राज ठाकरे Raj Thackeray यांच्यासोबतच्या ऐतिहासिक युतीचे अधिकृत जाहीर प्रकटीकरण केले. वरळी येथील ‘ब्ल्यू सी’ हॉटेलमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी दिल्लीश्वरांपासून ते महाराष्ट्रातील कपटी राजकारण्यांपर्यंत सर्वांवर जोरदार हल्ला चढवला.
ठाकरे घराण्याचा वारसा आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भावनिक आणि ऐतिहासिक संदर्भाने केली. ते म्हणाले, “मराठी माणसाने 105 हुतात्म्यांचे बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पाच सेनापतींपैकी एक होते. माझे वडील बाळासाहेब ठाकरे आणि राजचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी या संघर्षात स्वतःला झोकून दिले होते. तो वारसा चालवणे हे आमचे कर्तव्य आहे.”
दिल्लीतील ‘त्या’ दोघांना इशारा
मुंबईवर पुन्हा एकदा संकट ओढावले असल्याचे सांगताना उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीतील सत्तेवर निशाणा साधला. “आज पुन्हा एकदा मुंबईचे लचके तोडायचे मनसुबे दिल्लीतल्या दोघांचे आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कपटी कारस्थान रचले जात आहे. आत्ता जर आपण भांडत बसलो, तर तो मुंबईतील हुतात्मा स्मारकाचा अपमान असेल. त्यामुळेच महाराष्ट्रावर किंवा मुंबईवर जो कोणी वाकडी नजर टाकेल, त्याचा राजकारणातून खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत,” असा इशारा त्यांनी दिला.
“मराठी माणसा, आता चुकाल तर संपाल!”
मराठी मतदारांना आवाहन करताना उद्धव ठाकरे अधिक आक्रमक झाले. ते म्हणाले,”मी सगळ्या मराठी जणांना सांगतो, आता जर चुकाल तर संपाल. आता फुटाल, तर पूर्णपणे संपून जाल. त्यामुळे तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका. मराठी माणूस सहसा कोणाच्या वाटेला जात नाही, पण जर कोणी त्याच्या वाटेला आला, तर त्याला तो परत जाऊ देत नाही.”
युतीचे स्वरूप आणि भविष्यातील रणनीती
या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले की, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना (UBT) आणि मनसे एकत्रितपणे ‘मशाल’ आणि ‘इंजिन’ या चिन्हांसह मैदानात उतरतील. ‘जिंकेल त्याची जागा’ या मेरीटवर आधारित सूत्राने सात प्रमुख महापालिकांमधील जागावाटप अंतिम करण्यात आले आहे. या युतीमुळे मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार असून मराठी मतांचे विभाजन रोखण्याचे मोठे आव्हान आता महायुतीसमोर उभे राहिले आहे.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…