
Amit Satam On Mumbai BMC : फडणवीस दावोसला असले तरी शिंदेंच्या संपर्कात; महायुतीचे 118 नगरसेवक मिळून घेणार मुंबईच्या भविष्याचा निर्णय; सरवणकरांना मीडियासमोर न बोलण्याचा सल्ला
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीत Mumbai BMC Election महायुतीला 118 जागांसह स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता महापौर कोणाचा होणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. यावर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले की, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात कोणतेही मतभेद नसून, महापौरपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले मिळून घेतील.
अमित साटम यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असले तरी, ते सातत्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात आहेत. महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामुळे महापौर आमचाच होणार यात शंका नाही. आमचे उद्दिष्ट केवळ सत्ता मिळवणे नसून मुंबईला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि सुरक्षितता देणे हे आहे. कोणाला कोणता अनुभव आहे आणि कोण कोणत्या समितीला न्याय देऊ शकेल, याचा सारासार विचार करूनच पदांचे वाटप केले जाईल.”
समाधान सरवणकर यांच्या आरोपांवर उत्तर
प्रभादेवी-वरळीत भाजपच्या एका विशिष्ट गटाने (टोळीने) आपल्याला पाडण्याचे काम केले, असा गंभीर आरोप समाधान सरवणकर यांनी केला होता. त्यावर बोलताना साटम म्हणाले की, “समाधान सरवणकर यांनी भाजपवर नाही, तर काही विशिष्ट व्यक्तींवर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या तक्रारीत किती सत्यता आहे, हे आम्ही त्यांच्याशी आणि इतरांशी चर्चा करून तपासून पाहू. मात्र, अशा प्रकारच्या तक्रारी मीडियासमोर बोलण्याऐवजी आपापसात चर्चा करून सोडवणे जास्त योग्य असते. त्यांनी मीडियासमोर बोलणे टाळले पाहिजे होते.”
जागावाटप आणि मुस्लिम बहुल भागातील पराभव
शिंदे गटाला मुस्लिम बहुल भागातील जागा दिल्या गेल्यामुळे त्यांचा पराभव झाला, या चर्चेवरही साटम यांनी भाष्य केले. “जागावाटपाची चर्चा अत्यंत सविस्तर झाली होती. कोणत्या वॉर्डात कोणत्या पक्षाचा संघटनात्मक प्रभाव आहे आणि जनभावना काय आहे, हे पाहूनच जागांचे वाटप करण्यात आले होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.


