
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : संभाजीनगरातील ‘हंबरडा मोर्चा’तून मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान: ‘दिवाळीपूर्वी एक लाख जमा करा!’
छत्रपती संभाजीनगर :- ‘शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या’ या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज (शनिवार, 11 ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हंबरडा मोर्चा’ काढला. या मोर्चात सहभागी झालेले पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यावर ‘इतिहासातील सर्वात मोठी थाप’ मारल्याचा गंभीर आरोप केला.
इतिहासातील सर्वात मोठी थाप!
उद्धव ठाकरे यांनी पॅकेजवरून राज्य सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, “सरकारने जाहीर केलेले पॅकेज पाहिल्यावर सगळ्यांना वाटले की इतिहासातले सर्वात मोठे पॅकेज आहे. पण नाही, ही इतिहासातली सर्वात मोठी थाप आहे! आजपर्यंत इतकी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारलेली नाही. इतकी मोठी थाप देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मारलेली आहे.”
देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
शेतकऱ्यांनी सांगितलेले ‘राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिले’ हे उदाहरण देत ठाकरे यांनी फडणवीसांना थेट आव्हान दिले.
“मी या सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे समर्थन करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. मुख्यमंत्री बोललेत, खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी मनरेगातून साडेतीन लाख रुपये देणार आहोत. मग मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतोय की, तुमची नियत असेल तर दिवाळीपूर्वी तीन लाखातील एक लाख रुपये माझ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करा,” असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले.
’50 खोके’ आणि पंतप्रधान
’50 हजार रुपये हेक्टरी मदत कोणाकडे मागत आहोत, तर 59 खोके ज्यांनी घेतले आहेत त्यांच्याकडे मागत आहोत. त्यामुळे ते सहजासहजी वठणीवर येणार नाहीत. तुम्हाला चाबूक हातात घ्यावा लागेल,’ अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. “पंतप्रधानांना जिथे आपण चाललो आहोत तिथली परिस्थिती माहित नाही, तर आपण त्यांच्याकडे काय न्याय मागत आहोत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे’
“आम्हाला कर्जाचे पुनर्गठन नको आहे. आजचं मरण उद्यावर नको. आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवल्याचे सांगत, “जर तुम्ही कर्जमुक्त केली नाही, तर आम्ही फक्त मराठवाडा नाही, तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही,” असा कडक इशारा उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला दिला.



