
Uddhav Thackeray On BJP : ठाकरे-पवार नावं पुसून मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव; 20 वर्षांनंतर ‘ठाकरे बंधू’ एकत्र, शिवतीर्थावरून रणशिंग फुंकले
मुंबई | “गुजरातचा मुंबईवर आजही डोळा आहे. भाजपचे तमिळनाडूतील नेते अण्णामलाई इथे येऊन जे बोलले, तेच भाजपच्या मनात आहे. त्यांना मुंबईचे पुन्हा ‘बॉम्बे’ करायचे असून, इथला मराठी टक्का संपवून हे शहर अदानीला आंदण देणे हाच भाजपचा मूळ हेतू आहे,” अशी घणाघाती टीका शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी केली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या संयुक्त ‘शिवशक्ती’ मेळाव्यात ते बोलत होते.
‘मेवाभाऊ’ आणि 3 लाख कोटींचा घोटाळा
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘मेवाभाऊ’ असा करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “आम्ही मुंबई महापालिकेच्या ठेवी 92 हजार कोटींपर्यंत नेल्या होत्या, पण या सरकारने त्या 70 हजार कोटींपर्यंत आणून ठेवल्या आहेत. मुंबईत 3 लाख कोटींचा घोटाळा भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला असून, ही लाचार माकडे कधीच वाघ बनू शकत नाहीत,” अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी भाजप आणि शिंदे गटाचा समाचार घेतला.
राज ठाकरेंच्या विचारांना समर्थन
राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेचे स्वागत करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “राज यांनी आज जे विचार पोटतिडकीने मांडले आहेत, त्यानंतरही जर मराठी माणसाच्या डोक्यात तिडीक गेली नाही, तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.” तसेच, भाषेवरून राजकारण करणाऱ्या भाजपला टोला लगावताना ते म्हणाले की, “राज यांनी ‘मराठी बांधवांनो’ म्हटले म्हणून उद्या भाजपवाले मुद्दा करतील. पण भाजप केवळ निवडणुकीपुरता हिंदू-मुस्लिम आणि मराठी-अमराठी असा ‘रोम्बासोम्बा’ डान्स करते.”
अजित पवारांच्या मुद्द्यावरून भाजपची कोंडी
ज्या अजित पवारांवर भाजपने 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते, त्यांच्याच सोबत सत्तेत बसण्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला धारेवर धरले.”फडणवीसांनी अजित पवारांविरुद्ध दिलेले पुरावे जर खरे नसतील, तर त्यांची जाहीर माफी मागा. अन्यथा, त्यांना सत्तेतून बाहेर काढण्याची हिंमत दाखवा,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.
मुंबई वाचवण्याचे आवाहन
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात शाहीर अमरशेख यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देत उद्धव ठाकरे म्हणाले की, “मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना ही जनता धडा शिकवेल. मुंबई महापालिका आम्हाला पुन्हा हवी आहे, कारण हे शहर आम्हाला अदानीच्या हाती जाऊ द्यायचे नाही



