Uddhav Thackeray : ‘मराठवाड्यात पिढ्यांचे नुकसान’; उद्धव ठाकरेंचा उद्या पूरग्रस्त भागाचा दौरा, संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा

Sanjay Raut On Maharashtra Sarkar : सरकारच्या तिजोरीत पैसा नाही, मिंध्यांच्या तिजोऱ्या रिकाम्या करा’; राऊतांचे आक्रमक विधान
मुंबई :- मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर अनेक पिढ्यांचे नुकसान झाले असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘या सरकारने मराठवाड्याचे झालेले नुकसान गांभीर्याने घेतले नाही,’ असा आरोप करत राऊत Sanjay Raut यांनी सरकारवर जोरदार टीका केली. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या (26 सप्टेंबर) मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
‘मिंध्यांच्या तिजोऱ्या रिकाम्या करा’
संजय राऊत यांनी सरकारला आक्रमकपणे आव्हान दिले. ‘अशा वेळी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे मिंध्यांच्या तिजोऱ्या रिकाम्या करण्याचे आव्हान मी देतो,’ असे राऊत म्हणाले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची घरे, शेती आणि जमीन मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे, असे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी पिके नष्ट झाली असून, जमिनीची माती वाहून गेल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असल्याचे ते म्हणाले.
केंद्राकडे 10 हजार कोटींची मागणी
राऊत यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडे मराठवाड्यासाठी 10 हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे. या निधीचा उपयोग पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि जमीन व घरांची पुनर्बांधणी करण्यासाठी केला जाईल.
उद्याच्या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे स्थानिक नेत्यांसोबत नुकसानग्रस्त भागांची पाहणी करतील आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतील, असेही राऊत यांनी सांगितले. या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.


