मुंबई

Uddhav Thackeray : “पवारांच्या सावलीतून बाहेर पडून दादांनी स्वतःची ओळख निर्माण केली”; विधान परिषदेत उद्धव ठाकरे भावूक

• अजितदादांसारखा दिलदार सहकारी गमावला; 70 हजार कोटींच्या आरोपांवरून ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावले

मुंबई :- “अजित पवार आणि आम्ही राजकीय दृष्ट्या कधी एकत्र येऊ असं वाटलंही नव्हतं. पण जेव्हा एकत्र आलो, तेव्हा मला जाणवलं की अजितदादांसारखा उत्तम, दिलदार सहकारी आणि मित्र दुसरा नाही. एका मोठ्या वृक्षाच्या (शरद पवार) सावलीतून बाहेर पडून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची ताकद फक्त अजितदादांमध्येच होती,” अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर ठाकरे बोलत होते.

दोन ‘सकाळ’ आणि बारामतीचे पोरकेपण

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दोन महत्त्वाच्या प्रसंगांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “आपण दोन सकाळ पाहिल्या आहेत. एका सकाळच्या बातमीने (पहाटेचा शपथविधी) अजित पवारांनी सगळ्यांना धक्का दिला होता, तर दुसऱ्या सकाळच्या बातमीने (विमान अपघात) संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. मी जेव्हा बारामतीत गेलो होतो, तेव्हा दादांनी मला तिथला कायापालट दाखवला होता. पण ज्या दिवशी ही दुर्घटना घडली, तेव्हा आनंदाने भरलेली बारामती पोरकी झाल्याचे मला जाणवले.”

प्रशासनातील ‘आधारस्तंभ

मुख्यमंत्री म्हणून काम करताना आलेल्या अनुभवावर बोलताना ठाकरे म्हणाले, “मला प्रशासनाचा अनुभव नव्हता, पण अजितदादांनी मला सांभाळून घेतलं. एखादी गोष्ट कळली नाही तर मी हक्काने त्यांच्याशी बोलायचो. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा अर्थचक्र थांबण्याची भीती होती, तेव्हा दादांनी राज्याची तिजोरी सांभाळली आणि कोणतीही योजना बंद पडू दिली नाही. त्यांच्या समोरचे टेबल नेहमी आवरलेले आणि काटकोनात असायचे, हीच शिस्त त्यांच्या कामातही दिसायची.”

बदनामीच्या राजकारणावर प्रहार

अजित पवारांवर झालेल्या आरोपांचा उल्लेख करत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “ज्यांनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले, त्यांच्याच सोबत सत्तेत असल्याचे शल्य दादांनी बोलून दाखवले होते. माणूस जिवंत असताना त्याला किती बदनाम करायचे, त्याला आयुष्यातून उठवायचे का? यावर आपण मर्यादा ठेवली पाहिजे. दादांच्या मनात पाप नसायचे, म्हणून ते बिनधास्त बोलायचे. त्यांच्या आवाजात एक भारदस्तपणा होता ज्यामुळे अधिकारीही त्यांना वचकून असायचे,” असे ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राचे न भरून निघणारे नुकसान

“वेळ आणि घड्याळाशी त्यांचे अतूट नाते होते. ते वेळेचे पक्के होते. आज महाराष्ट्राने एक उमदं नेतृत्व गमावलं आहे. हा दुःखाचा डोंगर केवळ पवार कुटुंबावर नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रावर कोसळला आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपल्या जुन्या सहकाऱ्याला अखेरची श्रद्धांजली वाहिली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

38 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago