महाराष्ट्र

Uday Samant : रत्नागिरीत उद्योजकाच्या कात कारखान्यावर ईडीची छापेमारी! – उद्योगमंत्री उदय सामंतांच्या निकटवर्तीयावर सकाळीच मोठी कारवाई, जिल्ह्यात खळबळ

•खेड आणि चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे ईडीचे पथक दाखल; कारखान्यातील कागदपत्रे आणि आर्थिक नोंदींची तपासणी सुरू, राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे गुरुवारी (11 डिसेंबर) सकाळी कात उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर ईडीकडून (ED) छापेमारी करण्यात आली आहे. नामवंत उद्योजक सचिन पाकळे यांच्या कारखान्यावर ही अचानक धाड टाकल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

उद्योगमंत्र्यांचे निकटवर्तीय

सचिन पाकळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत उद्योजक असून त्यांचा राजकीय वावरही मोठा आहे. ते राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि आमदार शेखर निकम यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. यामुळे या धाडीने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

छापेमारीची प्रक्रिया

चिपळूण सावर्डे येथे सकाळी आठ वाजताच ईडीचे अधिकारी मोठ्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी कारखान्यातील कागदपत्रे, व्यवहार आणि आर्थिक नोंदींची तपासणी सुरू केली आहे. संपूर्ण कारवाईदरम्यान कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे, त्यामुळे धाड कोणत्या प्रकरणात करण्यात आली किंवा नेमका कोणता आर्थिक गैरव्यवहार आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. परिसरात पोलिसांचा मोठा वावर असल्याने खेडसह संपूर्ण जिल्ह्यात या धाडीची जोरदार चर्चा सुरू आहे.

vivek

Recent Posts