महाराष्ट्र

Tushar Bhosle : अब्दुल सत्तारांच्या मंदिर दर्शनावरून वाद पेटला! “इतकीच इच्छा असेल तर हिंदू धर्म स्वीकारा”; भाजपच्या तुषार भोसलेंचा सत्तारांना सल्ला

BJP Tushar Bhosle On Abdul Sattar : शंकराच्या मंदिरात गोमूत्र शिंपडून तरुणांकडून ‘शुद्धीकरण’; गर्भगृहात जाण्यावरून अध्यात्मिक आघाडी आक्रमक

वर्धा | महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी गेलेले आमदार अब्दुल सत्तार MLA Abdul Sattar यांच्या कृतीमुळे धार्मिक आणि राजकीय वातावरण तापले आहे. अब्दुल सत्तार यांनी रविवारी रहिमाबाद येथील प्राचीन नागेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले होते. मात्र, त्यांच्या या दर्शनानंतर काही स्थानिक तरुणांनी मंदिर ‘अपवित्र’ झाल्याचा दावा करत संपूर्ण परिसरात गोमूत्र शिंपडले. या घटनेचे पडसाद उमटत असतानाच, भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले Tushar Bhosle यांनी सत्तारांवर सडकून टीका केली आहे.

तुषार भोसले यांचा प्रहार

सोमवारी वर्धा येथे पत्रकारांशी बोलताना तुषार भोसले यांनी सत्तारांच्या मंदिर प्रवेशावर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले,”आमची मंदिरे ही काही पर्यटन स्थळे किंवा स्मारके नाहीत. गर्भगृहाचे ठराविक धार्मिक नियम असतात. अब्दुल सत्तार यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे का? तसे नसेल तर त्यांनी नियमांचे पालन करून बाहेरून दर्शन घ्यायला हवे होते. केवळ राजकीय फायद्यासाठी धर्माचे नियम मोडू नका. जर तुम्हाला देवाचे आशीर्वाद घ्यायची इतकीच ओढ असेल, तर अधिकृतपणे हिंदू धर्मात प्रवेश करा आणि मग खुशाल मंदिरात या.”

तरुणांचा आक्षेप काय?

मंदिराचे शुद्धीकरण करणाऱ्या तरुणांनी अब्दुल सत्तार यांच्या जीवनशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “सत्तार सकाळी मांसाहार केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत, अशा अपवित्र व्यक्तीने महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी मंदिरात येणे चुकीचे आहे,” असा दावा या तरुणांनी केला आहे. सत्तारांनी दर्शन घेतल्यानंतर या तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडून स्वच्छता केली.

राजकीय वळण

अब्दुल सत्तार हे महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यांच्याच मित्रपक्षातील (भाजप) अध्यात्मिक आघाडीने त्यांच्यावर अशा प्रकारे टीका केल्याने महायुतीमध्ये या मुद्द्यावरून अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संपूर्ण वादावर अब्दुल सत्तार यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

vivek

Recent Posts