Raigad Rain Update : रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर! नद्यांची पातळी धोक्याच्या वर, शाळांना सुट्टी

Raigad Rain Update : पाली-खोपोली मार्ग बंद, भेराव गावाचा संपर्क तुटला; जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे आदेश
रायगड | रायगड जिल्ह्यावर निसर्गाचा रौद्र अवतार कोसळला असून, सलग रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. कुंडलिका आणि आंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून, पाताळगंगा नदी इशारा पातळी गाठून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूर या पाच तालुक्यांतील सर्व शाळांना तातडीची सुट्टी जाहीर केली आहे. Raigad Rain Update
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सकाळी आठ वाजता अधिसूचना जारी करत परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करण्यात आले. सकाळच्या सत्रातील वर्ग बंद करून विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या घरी पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, पावसामुळे आंबा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने पाली-खोपोली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सुधागड तालुक्यातील भेराव गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटला असून, या भागातील रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. डोंगर उतारावरील आणि नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात सरासरी 149 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः माथेरानमध्ये सर्वाधिक 262 मिमी, खालापूर 205 मिमी, पनवेल 203 मिमी आणि पेणमध्ये 195 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन सतर्कतेच्या मोडमध्ये आहे.


