दहीहंडीच्या सरावादरम्यान दुर्देवी घटना: 6 व्या थरावरून कोसळून 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू

Dahisar Dahi Handi 2025 News :केतकीपाड्यातील नवतरुण मंडळाचा सदस्य होता चिमुकला; आयोजकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
मुंबई :- दहीहंडीचा सराव सुरू असताना एका 11 वर्षीय चिमुकल्याचा 6 व्या थरावरून कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री ही दुर्घटना घडली असून, या घटनेने मुंबईसह राज्यभरात शोककळा पसरली आहे. आगामी दहीहंडी उत्सवाच्या तयारीला वेग आला असतानाच घडलेल्या या घटनेमुळे गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. Dahisar Dahi Handi Incident
मिळालेल्या माहितीनुसार, दहिसरच्या नवतरुण मित्रमंडळाचे गोविंदा पथक रात्री सराव करत होते. या पथकातील महेश रमेश जाधव (11 वय) हा चिमुकला गोविंदा 6 व्या थरावर चढला होता. रात्री पावणेदहाच्या सुमारास तो अचानक कोसळला आणि त्याला खाली झेलण्यापूर्वीच तो जमिनीवर पडला. गंभीर जखमी झालेल्या महेशला तातडीने दहिसर पूर्वेकडील प्रगती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर दहिसर पोलिसांनी आयोजक मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरावादरम्यान मंडळाने पुरेशी सुरक्षा व्यवस्था केलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप होण्याची शक्यता आहे.
राज्यात काही दिवसांवर आलेल्या दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षही लाखोंची बक्षिसे जाहीर करून उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे उंच थर रचण्याची स्पर्धा वाढली असून, त्यातच ही दुर्दैवी घटना घडल्याने गोविंदांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेमुळे उत्सवातील उत्साहावर शोकाची छाया पसरली आहे.


