Today’s Weather Update : हवामान खात्याचा अंदाज राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता

•कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज
मुंबई :- पावसाने विश्रांती घेतल्यानंतर रविवारपासून पुन्हा एकदा पावसाने जोर दाखवला आहे. राज्यात विविध भागात आज देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसापासून या जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच आज देखील रत्नागिरी आणि रायगड परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भातील अमरावती चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा आदी जिल्ह्यांना देखील भारतीय हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भाला पावसाने चांगलेच झोडपले आहे. याचा परिणाम येथील शेत पिकांवर देखील झाला आहे. तसेच आज देखील विदर्भातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.