
•BJP On Tipu Sultan : टिपू सुलतानशी केलेल्या तुलनेवरून भाजप आक्रमक; जुन्या बसस्थानक चौकात जोरदार निदर्शने; काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट
मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी Tipu Sultan केल्याच्या निषेधार्थ भाजपने राज्यभर आंदोलने छेडली आहेत. या आंदोलनादरम्यान भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी अत्यंत प्रक्षोभक विधान करत, हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या विधानामुळे वातावरण अधिकच तापले असून कायद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेमकं काय घडलं?
शहरातील जुन्या बसस्थानक चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना अनिल मोहिते म्हणाले,”छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. केवळ मतांच्या लांगूलचालनासाठी सपकाळ यांनी क्रूर टिपू सुलतानची बरोबरी महाराजांशी केली आहे. हा शिवरायांचा अवमान आहे. अशा व्यक्तीची जीभ छाटणाऱ्यास भाजपच्या वतीने 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.”
पुण्यातील काँग्रेस भवनसमोर राडा
दुसरीकडे, पुण्यातही या वादाचे हिंसक पडसाद उमटले आहेत. शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनसमोर पतित पावन संघटना आणि भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी आंदोलन केले. यावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने दोन्ही गटात मोठी झटापट झाली.
दगडफेक: आंदोलनादरम्यान दोन्ही बाजूंनी दगड भिरकावण्यात आले, ज्यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
पोलीस बंदोबस्त: वाढता तणाव पाहता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. सध्या काँग्रेस भवन परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
तुलनेवरून संतापाची लाट
भाजप नेत्यांच्या मते, टिपू सुलतानने हजारो हिंदूंचे धर्मांतर केले आणि हत्या केल्या, अशा व्यक्तीची तुलना रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या महाराजांशी करणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. मात्र, अनिल मोहिते यांनी दिलेल्या ‘बक्षीस’ घोषणेमुळे आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



