मुंबई

जलजीवन मिशनचा ‘जीवन’ संपला! कंत्राटदाराच्या आत्महत्येने सरकार हादरले; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, आव्हाडांची मागणी

Sangli Suicide Case : थकीत बिलांमुळे कंत्राटदाराची आत्महत्या; ‘पुढचा नंबर माझाच’ म्हणत अन्य तरुणाची भीती व्यक्त

मुंबई :- सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचे काम पूर्ण करूनही, कामाचे 1.40 कोटी रुपये न मिळाल्याने आणि त्यापोटी घेतलेल्या 65 लाखांच्या कर्जामुळे हर्षल यांनी आपले जीवन संपवले. त्यांच्या आत्महत्येमुळे आता राज्य सरकारवर टीकेची झोड उठली असून, कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. Sangli Latest News

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर हर्षल यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट लिहिली. आव्हाडांनी या पोस्टमध्ये म्हटले होते की, हर्षल पाटील हा एक कष्टाळू तरुण कंत्राटदार होता, ज्याने सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनचे काम पूर्ण केले. मात्र, कामाचे पैसे न मिळाल्याने आणि कर्जबाजारीपणामुळे त्याला आत्महत्या करावी लागली. हर्षल यांच्या पश्चात त्यांची पत्नी, लहान मुलगी, वृद्ध आई-वडील आणि दोन लहान भाऊ असे कुटुंब आहे.

आव्हाडांच्या या पोस्टवर एका अज्ञात कंत्राटदार तरुणाने दिलेली प्रतिक्रिया अधिक धक्कादायक आहे. या तरुणाने आव्हाडांना थेट संदेश पाठवत म्हटले आहे की, “तुमची ही पोस्ट बघितली आणि पुढचा नंबर माझाच असेल असं वाटत आहे. मी सुद्धा सरकारी कामं केली आहेत आणि माझी देखील अनेक बिले थकीत आहेत.” ही गंभीर प्रतिक्रिया आव्हाडांनी तात्काळ समाजमाध्यमांवर शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

आमदार आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “लाडकी बहीण योजना ही एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिकदृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाहीये. एकीकडे या योजनेसाठी सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी बाजूला काढला, राज्यावर कर्जाचा बोजा वाढवला. दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा खात्याशी संबंधित हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिलं अडवली गेली आहेत. कारण राज्य सरकारकडे ही बिलं देण्यासाठी पैसेच नाहीयेत.” आव्हाडांनी यापूर्वीच इशारा दिला होता की, “काही महिने जाऊ द्या… कितीतरी कंत्राटदार आत्महत्या करतील…!” आणि दुर्दैवाने त्याची सुरुवात झाल्याचे त्यांनी नमूद केले.

हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दु:खद घटना नसून, हे प्रशासकीय अपयश आणि आर्थिक संकटाचा एक गंभीर इशारा असल्याचे आव्हाडांनी म्हटले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी मोफत सुविधा द्यायच्या, पण त्यामागे आवश्यक असणारा आर्थिक ताळेबंद साधायचा नाही, हे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्य शासन, प्रशासन आणि समाजाने ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आव्हाडांनी अधोरेखित केली आहे.

vivek

Recent Posts