
Thane City Latest Traffic Update News : दिवसा जड वाहतुकीला परवानगी; दोन दिवसांपूर्वीचे निर्बंध रद्द घोडबंदरची कोंडी सुटली, पण इतर जिल्ह्यांत वाहतूक ठप्प
ठाणे :- ठाणे शहरासह घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लावण्यात आलेले जड वाहनांवरील निर्बंध अवघ्या दोन दिवसांतच मागे घेण्याची नामुष्की ठाणे जिल्हाधिकाऱ्यांवर ओढावली आहे. या निर्णयामुळे ठाणे ग्रामीण, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली होती, ज्यात दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पूर्वीचे वाहतूक बदल रद्द केले आहेत. Thane Latest Traffic News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
घोडबंदर मार्गावरील कोंडीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या आंदोलनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक घेऊन रात्री 12 नंतरच अवजड वाहने सोडण्याचे आदेश दिले होते. यानंतर, ठाणे वाहतूक पोलिसांनी रात्री 12 ते पहाटे 6 या वेळेतच जड वाहनांना परवानगी देणारी अधिसूचना काढली. यामुळे घोडबंदरची वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली, मात्र त्याचा भार इतर जिल्ह्यांवर पडला.
दिवसा जड वाहतुकीला परवानगी
इतर जिल्ह्यांमध्ये वाढत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे आणि एका निष्पाप चिमुकल्याच्या मृत्यूनंतर डॉ. पांचाळ यांनी हा निर्णय मागे घेतला. आता 20 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत ठाणे जिल्ह्यातून दिवसा, म्हणजेच सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत अवजड (दहा चाकी ट्रक आणि त्यापेक्षा जास्त) वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पहाटे 5 ते सकाळी 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 11 या वेळेत ही वाहने बंद राहतील.
जड-अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग
नवीन अधिसूचनेनुसार, विविध भागांतून येणाऱ्या जड-अवजड वाहनांना ठराविक ठिकाणी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
पालघर वाडा रोडने भिवंडीकडे: अंबाडी, गणेशपुरी येथे प्रवेश बंद.
चिंचोटी येथून ठाणे/भिवंडीकडे: खारबाव, भिवंडी येथे प्रवेश बंद.
वडपा चेक पोस्टकडून ठाणे/भिवंडीकडे: वडपा, भिवंडी नाका येथे प्रवेश बंद.
नाशिककडून मुंबईकडे: कसारा येथे प्रवेश बंद. समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या वाहनांना इगतपुरी बोगदा येथे प्रवेश बंद.
नाशिक महामार्गाकडून पुणे/नवी मुंबईकडे: तळवली, पडघा येथे प्रवेश बंद.
मुरबाड येथून कल्याणकडे: मुरबाड चौक येथे प्रवेश बंद.
कर्जतकडून बदलापूरकडे: वांगणी, कुळगाव येथे प्रवेश बंद.
अत्यावश्यक सेवा वगळल्या
या वाहतूक बदलातून अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहने आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने वगळण्यात आली आहेत. ठाणे ग्रामीण जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्गही निश्चित करण्यात आले आहेत.



