पुणे विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई! – बँकाँकहून आलेल्या प्रवाशाकडून 2.29 कोटी रुपयांचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त

Pune Airport Latest News : आंतरराष्ट्रीय बाजारात महागडा असलेला 2 किलो 299 ग्रॅम गांजा तस्करी करताना पकडला; अधिकाऱ्यांचे संशयावरून तातडीने ताब्यात घेण्याचे कृत्य यशस्वी
पुणे :- पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune International Airport) सीमाशुल्क विभागाच्या (Customs) पथकाने गांजाची तस्करी करणाऱ्या एका प्रवाशाला अटक करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपीकडून तब्बल दोन कोटी 29 लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे.
ही घटना 8 डिसेंबर रोजी घडली. बँकाँकहून आलेल्या विमानातून एक प्रवासी पुणे विमानतळावर उतरला.
हा प्रवासी घाईघाईत विमानतळावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या संशयास्पद वर्तनामुळे कस्टमच्या पथकातील अधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्याच्याकडील सामानाची कसून तपासणी केली असता, पिशवीत 2,229 ग्रॅम (2 किलो 299 ग्रॅम) वजनाचा हायड्रोपोनिक गांजा सापडला. हायड्रोपोनिक गांजाची लागवड नियंत्रित वातावरणात केली जाते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत खूप जास्त असते. जप्त केलेल्या या गांजाची किंमत दोन कोटी 29 लाख रुपये असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली.
प्रवाशाने चौकशीत हा गांजा बँकाँकहून आणल्याची माहिती कस्टमच्या पथकाला दिली आहे. तो गांजा पुणे किंवा अन्यत्र कोणाला देणार होता, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. हायड्रोपोनिक गांजा तस्करीचे प्रकार वाढल्याने कस्टम अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवाशाविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



