क्राईम न्यूज

Thane Police : लाल किल्ला स्फोटानंतर ठाणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! रेल्वे स्थानके, मॉल्समध्ये कसून तपासणी

Thane Police Latest News : मध्य रेल्वे स्थानके, हॉटेल, गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला; समाजमाध्यमांवरही पोलिसांचे बारीक लक्ष

ठाणे :- राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी रात्री झालेल्या भीषण स्फोटानंतर संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे पोलीस आणि रेल्वे पोलीस पूर्णपणे सतर्क झाले असून, त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तपासणी आणि नाकाबंदी सुरू केली आहे.

मध्य रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकांपैकी ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर रेल्वे पोलिसांनी यंत्रणा सतर्क केली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथके आणि श्वानांच्या मदतीने संशयास्पद वस्तू आणि व्यक्तींच्या बॅगांची कसून तपासणी केली जात आहे. बहुतांश रेल्वे स्थानकात पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.

तर, ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्रीपासूनच शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी केली होती, तसेच रात्रीच्या गस्ती वाढविण्यात आल्या आहेत. ठाणे, कल्याण शहरातील मॉल्स, वाहन तळ, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरातील हॉटेल आणि इतर गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. हॉटेलमध्ये कोणी संशयास्पद व्यक्ती राहण्यास आले आहेत का, याची चौकशी केली जात आहे.

या काळात समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्या जातात. त्यामुळे दिशाभूल करणारे समाजमाध्यमावरील वक्तव्ये आणि पोस्टवर देखील पोलिसांचे बारीक लक्ष आहे. सुरक्षा यंत्रणांनी ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी या शहरांमध्ये कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी नागरिकांना संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळून आल्यास तातडीने पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

vivek

Recent Posts