
Suhas Samant Joiend Shinde Group : “51 वर्षांची कारकीर्द शून्य केली, माझा बळी दिला!” – उपनेतेपदाचा राजीनामा देऊन सामंतांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
मुंबई :- मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे निष्ठावान मानले जाणारे आणि बेस्ट कामगार सेनेचे माजी अध्यक्ष सुहास सामंत यांनी अखेर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवारी दादर येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंत यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.



शिवसेनेत (ठाकरे) उपनेतेपद भूषवलेल्या सुहास सामंत यांनी अत्यंत भावनिक होऊन आपली खंत व्यक्त केली. ऑगस्ट महिन्यात बेस्टच्या पतपेढीची निवडणूक झाली, ज्यात ठाकरे गटाच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला होता. या पराभवानंतर सामंत यांनी आपल्या कार्यकारिणीचा राजीनामा दिला होता. “बेस्टच्या पतपेढीची निवडणूक हरलो, म्हणून माझा बळी दिला. मला राजीनामा द्यायला लावला,” असा थेट आरोप सामंत यांनी केला. ते म्हणाले, “मी 51 वर्षे ‘मातोश्री’बरोबर प्रामाणिकपणे राहिलो आणि 31 वर्ष बेस्ट कामगार सेनेची धुरा वाहिली. निवडणूक हरलो म्हणून मला त्या पदावरून बाजूला केले.” यानंतर त्यांच्या मुलाचे निधन झाले. “त्याला एक महिना व्हायच्या आतच पदावर इतरांची नेमणूक केली. माझी 51 वर्षांची कारकीर्द एका क्षणात शून्य झाली. तुम्ही महिनाभर थांबू शकला असतात. दुसऱ्यांच्या भावनांशी किती खेळायचे?” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दादर येथील सूर्यवंशी सभागृहात झालेल्या या प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी सामंत यांचे स्वागत केले आणि त्यांना उपनेतेपद बहाल केले. “बेस्ट उपक्रमाचे चाक तोट्यातून नफ्यात आणण्यासाठी आपण प्रयत्न करू,” असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
सामंत यांच्या प्रवेशामुळे मुंबईतील कामगार क्षेत्रातील ताकद शिवसेनेला (शिंदे) मिळाली असून, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.


