Thane Police News : ठाणे पोलिसांच्या महिला पोलिसांकरीता “फिरते विश्रामवाहन”, अत्याधुनिक सुविधांने संपन्न, पोलिसांचा अनोखा उपक्रम

Thane Police Latest News : ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडून महिला पोलिसांना भेट,”महिला पोलीस विश्रामिका”वाहनाचे उद्घाटन
ठाणे :- पोलीस विभागामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पोलीस देखील अहोरात्र काम करीत असतात. अनेक मोठे बंदोबस्त, महत्वाचे कार्यक्रम, अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सभा, उरूस, जत्रा, सस्तंग व धार्मिक सणांचे बंदोबस्त इत्यादी कर्तव्य पार पाडत असतांना पुरुषांप्रमाणेच महिला पोलीस देखील तितक्याच खंबीरपणे उभ्या असतात. त्यासाठी तासनतास एकाच जागेवर उभे राहून त्यांना कर्तव्य पार पाडावी लागत असतात. मात्र अशावेळी नैसर्गिक विधी पार पाडण्यासाठी महिला पोलीसांना अडचणींना सामोरे जावे लागते व त्यामुळे त्यांच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम होत असतो.
ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते उद्घाटन, सेवेत दाखल
आज (19 नोव्हेंबर) रोजी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या संकल्पनेतून ‘महिला पोलीस विश्रामिका’ या नावाची फिरती व्हॅन कार्यान्वित करण्यात आली आहे. ‘महिला पोलीस विश्रामिका’ या उपक्रमाअंतर्गत सध्या प्रायोगिक तत्वावर एक वाहन तयार करण्यात आलेले आहे. महिला पोलीस विश्राामिका वाहनाची उपयुक्तता पाहून प्रत्येक झोनमध्ये एक विश्रामिका सुरू करण्याचा पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचा मानस आहे.विश्रामिकेची संपुर्ण डिझाईन ‘सनवा मोटर्स प्रा. लि.’ यांनी केलेली असून त्यासाठी एच.डी.एफ. सी. बँकेचे देखील सहकार्य प्राप्त झालेले आहे. विश्रामिकेमुळे बंदोबस्तावरील महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निश्चितच फायदा होईल.








वाहनाचे वैशिष्ट्य
विश्रामिका टाटा 709 या वाहनाचा वापर करून तयार करण्यात आली असून तिच्यामध्ये महिला पोलीसांना त्या कर्तव्य बजावत असतांना नैसर्गिक विधी करण्यासाठी, लहान बाळांच्या स्तनपानासाठी, कपडे चेंज करण्यासाठी तसेच काही वेळ विश्रांती करण्यासाठी एक बाथरूम, एक टॉयलेट, दोन वॉश बेसिन, दोन चेंजिंग रूम व एक सोफा कम बेड अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर विश्रामिकेवर एक महिला पोलीस चालक व एक महिला पोलीस अंमलदार पुर्णवेळ नेमण्यात आलेले आहेत.